कणकवली : कणकवली शहरात उद्यान आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असून त्यानिमित्ताने नागरिकांची स्वप्नपूर्ती होणार आहे.रविवार १८ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार नितेश राणे तसेच अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.कणकवली नगरपंचायतच्यावतीने परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शेजारी कांबळी गल्ली येथे सुसज्ज असे उद्यान आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे.
कांबळी गल्लीत ७४ गुंठे क्षेत्रात हा प्रकल्प होणार असून सुमारे १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे . त्यापैकी साडेचार कोटीचे पहिल्या टप्प्यात काम होणार आहे . उद्यान आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कणकवली शहरात व्हावे अशी मागणी नागरिकांची होती.नगरपंचायत निवडणूक काळात आमदार नितेश राणे तसेच आपण नागरिकांना शहरात सुसज्ज उद्यान आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे आश्वासन दिले होते.त्याच्या पूर्तता यानिमित्ताने होणार आहे, असेही समीर नलावडे यांनी सांगितले.