कणकवली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना भाजपमध्ये वाटेल तितकी ताकद पुरवावी. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा त्यांना शह देऊन भगवा फडकवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, या अगोदर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महसूलमंत्री, उद्योगमंत्री अशी पदे देऊन नारायण राणेंना ताकद पुरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी राणेंचा माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १० हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.
त्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली नाही. दरम्यान, काँग्रेस पक्षही त्यांना सोडावा लागला होता. त्यामुळे राणेंना ताकद पुरवताना ते पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात निवडणूक लढवणार किंवा नाही, याची खातरजमा शहांनी करून घ्यावी.जर राणेंनी पुढची विधानसभा निवडणूक लढवली, तरी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जबाबदारी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून सर्वस्वी माझी राहील. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंचा उल्लेख ह्यमहाराष्ट्राचे दबंग नेतेह्ण असा केला. मग, या नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देताना ह्यतारीख पे तारीखह्ण देऊन वर्षभर ताटकळत का ठेवले होते? या प्रश्नाचे उत्तरसुद्धा त्यांनी द्यायला हवे होते.राणेंची नेमकी प्रतिमा काय आहे, हे जाणून घ्यायचे असेल, तर फडणवीस यांनी पाच वर्षांपूर्वी विधान परिषदेच्या सभागृहात त्यांच्यावर केलेल्या भाषणाचा व्हिडीओ शहा यांनी आवर्जून पहावा. अमित शहांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दाखले दिले. तसेच शिवसेना संपवण्याची भाषासुद्धा केली. पण त्यांना ते शक्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.भाजपने त्यांचे विचार कोठे बुडविले?शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार तापी नदीत बुडविले, असे ते म्हणतात. मग, जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीच्या महबुबा मुफ्तीसोबत भाजपने युती करून सत्ता स्थापन केली होती, तेव्हा आरएसएसच्या हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, नानाजी देशमुख या नेत्यांचे विचार शहांनी कोणत्या नाल्यात बुडविले होते, असा प्रश्नही या प्रसिद्धीपत्रकात वैभव नाईक यांनी केला आहे.