आंबोली (सिंधुदुर्ग) : सांगली शहर पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या अनिकेत अशोक कोथळे या संशयित आरोपीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. तो मृतदेह पोलिसांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आंबोलीत आणून पेटवून दिला. हा प्रकार सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आला होता. मात्र, त्याचे बिंग बुधवारी सकाळी फुटले. त्यानंतर सांगली व सिंधुदुर्गच्या सीआयडी पथकाने आरोपी पोलिसांसह आंबोलीत येऊन मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. या घडलेल्या प्रकाराने सांगलीबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही खळबळ माजली आहे.सांगलीतील एका दरोड्याच्या प्रकरणात शहर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यात अनिकेत कोथळे याचा समावेश होता. पोलीस या संशयित आरोपीकडून माहिती घेत असताना त्याच्यावर थर्ड डिग्रीचाही वापर करीत होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला होता. या घडलेल्या प्रकाराने बिथरलेल्या पोलिसांनी याची कुणकुण कोणालाच लागू नये म्हणून मृतदेह सायंकाळपर्यंत कोठडीतच ठेवला. तसेच आरोपी पळून गेला म्हणून बनाव करायचा, असे ठरले.त्याप्रमाणे सुरुवातीला शहर पोलिसांनी तसा बनावही केला व रात्रीच्या सुमारास ज्यांच्या मारहाणीत मृत्यू झाला ते सर्व पोलीस तो मृतदेह एका पोलीस कर्मचा-याच्याच गाडीत भरून आंबोलीत घेऊन आले. सुरुवातीला त्यांना आंबोली घाटात मृतदेह फेकायचा होता. पण जर मृतदेह कोणाच्या हाती लागला तर आपले बिंंग फुटेल, म्हणून या सर्व पोलिसांनी आंबोलीतील महादेवगड पॉइंट येथे रात्रीच्या वेळी कोण नसल्याचा कानोसा घेत पेट्रोल ओतून अनिकेत याचा मृतदेह पेटवून दिला. मृतदेह पेटला याची पूर्ण खात्री झाल्यावर हे सर्वजण आल्या मार्गाने सांगलीकडे रवाना झाले होते.मंगळवारी दिवसभर आरोपी पळून गेला असाच या पोलिसांनी बनाव सुरू केला होता. पण रात्री उशिरा वरिष्ठ पोलीस अधिका-यांना दरोड्याच्या आरोपातील आरोपीचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाची विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दखल घेत हा तपास सीआयडीकडे देण्याचे निश्चित केले. त्यानंतर सिंधुदुर्ग व सांगली येथील सीआयडीचे विशेष पथक आरोपी हेडकॉस्टेबल अरूण लाड याला घेऊन बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आंबोलीत दाखल झाले. या पथकाचे नेतृत्व सांगलीचे पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील व सिंधुदुर्गचे विजय यादव हे दोघे करीत होते. त्यांनी आरोपीला घेऊन महादेवगड पॉर्इंट हे घटनास्थळ गाठले. यावेळी हा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत रस्त्याच्या बाजूला घळणीत आढळून आला. कमरेच्या वरील भाग पूर्णत: जळालेला होता.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तसेच सायंकाळी उशिरा सांगेली येथील वैद्यकीय पथक बोलावून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. तसेच न्यायालयाच्या समक्ष हा मृतदेह गुरुवारी सांगली पोलीस ताब्यात घेणार आहेत. त्यामुळे बुधवारची प्रकिया रात्री उशिरापर्यंत थांबविण्यात आली होती.पोलीस फौजफाट्याने आंबोलीत खळबळबुधवारी दुपारी सांगलीहून तीस ते चाळीस पोलीस आंबोलीत दाखल झाले. त्यामुळे नेमके काय घडले याची माहिती कुणाला मिळत नव्हती. मात्र सांगलीतील एकाचा खून झाला, त्याचा मृतदेह आंबोलीत टाकला, एवढेच सांगण्यात येत होते. पण हळूहळू ग्रामस्थांना सर्व हकिकत समजली. पण सांगली पोलीस शांतपणे तपास करीत होते. उशिरापर्यंत महादेव गड पॉर्इंटवर मृतदेहाजवळ दहा ते बारा पोलीस बंदोबस्तासाठी ठेवले होते.आंबोली दूरक्षेत्राचा सीसीटीव्ही चार महिने बंदआरोपींनी मृतदेह सोमवारी रात्री आंबोलीत आणला असे ते सांगत असले तरी याची खातरजमा करण्यासाठी सीआयडीने दूरक्षेत्राचा सीसीटीव्ही सुरू आहे का ते पाहिले. पण तो बंद होता. त्यामुळे आरोपीच्या सांगण्यावरच विश्वास ठेवणे सध्यातरी कमप्राप्त आहे. गुन्ह्यात वापरलेली कार हेडकॉन्स्टेबल अरूण लाड याचीच असल्याचे सध्यातरी पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.मृतदेहाचा न्यायालयासमोर पंचनामामहादेवगड पाँइंट येथे मृतदेह पोलिसांनी शोधून काढला असला तरी अद्यापपर्यंत मृतदेह सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला नाही. गुरूवारी सकाळी न्यायालयाच्या समोर मृतदेहाचा पंचनामा होणार आहे. त्यानंतर मृतदेह सांगली पोलिसांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. सांगली पोलिसांचे एक पथक मृतदेहाच्या बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहे.
सांगलीतील आरोपीचा मृतदेह आंबोलीत जाळला, पोलिसांच्या कृत्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 11:17 PM