कासार्डे तिठा येथील पुलाला बॉक्सवेल करणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:44 AM2021-03-02T10:44:48+5:302021-03-02T10:47:23+5:30

highway Kankavli Sindhudurg-कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठा येथील कासार्डे हायस्कूलसमोर महामार्गावरील पुलाला बॉक्सवेल न घातल्याने कासार्डे माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

The bridge at Casarde Titha must be boxed | कासार्डे तिठा येथील पुलाला बॉक्सवेल करणे आवश्यक

मुंबई-गोवा महामार्गावरील कासार्डेतिठा पुलानजीक हायस्कूलसमोर अरुंद रस्त्यामुळे व वाहतूक कोंडी होत असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Next
ठळक मुद्देकासार्डे तिठा येथील पुलाला बॉक्सवेल करणे आवश्यक ग्रामस्थांच्यावतीने संजय पाताडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी मागणी

तळेरे : कणकवली तालुक्यातील कासार्डे तिठा येथील कासार्डे हायस्कूलसमोर महामार्गावरील पुलाला बॉक्सवेल न घातल्याने कासार्डे माध्यमिक, उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांची तसेच ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येताना आणि शाळा सुटल्यानंतर जीव धोक्यात घालून वाहनांचा अडथळा पार करीत प्रवास करावा लागत आहे.

या पुलाला हायस्कूलसमोर बॉक्सवेल मंजूर करून विद्यार्थी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय त्वरित दूर करावी अशी लेखी मागणी कासार्डेतील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय पाताडे यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत दखल घेतली गेली नाही तर कासार्डे पंचक्रोशीतील जनतेला तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.

कासार्डे तिठा येथे फोंडाघाटहून येणारा हमरस्ता मिळतो. तेथून‌ सुमारे ३०० मीटरवर कासार्डे तिठ्यापर्यंत नेहमीच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. वास्तविक ज्या ठिकाणी फोंडाघाटातून येणारा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला मिळतो त्याच ठिकाणी हायस्कूलसमोर एक बॉक्सवेल असणे आवश्यक होते.

या ठिकाणी बॉक्सवेल मंजूर व्हावा ही मागणी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून ग्रामस्थांकडून केली जात आहे. मात्र, महामार्ग प्राधिकरणाने याकडे कानाडोळा केल्याने बॉक्सवेल मंजूर झालेला नाही. असा आरोप पालक व ग्रामस्थांमधून केला जात आहे.

कासार्डे माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंत शिक्षण दिले जात असल्याने याठिकाणी सुमारे १२०९ पेक्षा अधिक विद्यार्थी नियमित ये-जा करीत आहेत. या विद्यार्थ्यांना नियमित प्रवास करताना या अरुंद रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे.

कासार्डेतील बहुतांश आस्थापना पुलाच्या पश्चिमेला असून कासार्डेच्या पश्चिमेला मोठी बाजारपेठ, दवाखाने, पेट्रोल पंप, पोस्ट कार्यालय, दूरध्वनी कार्यालय, बँक, पशुवैद्यकीय दवाखाना, दूध डेअरी, पोलीस ठाणे, सर्व गॅरेज, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्था या आस्थापना आहेत. तसेच पुलाच्या पूर्वेला कासार्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने ओझरम, दारुम, तळेरे या गावातील जनतेला याच अरुंद रस्त्याने प्रवास करावा लागतो.

खासदार, आमदार यांनाही सह्यांचे निवेदन

या संदर्भात कासार्डेचे सरपंच बाळाराम तानवडे, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांचे प्रतिनिधी संजय पाताडे तसेच नव तरुण उत्कर्ष मंडळ कासार्डेचे अध्यक्ष सहदेव खाडये यांनी १५०० ग्रामस्थांच्या सह्यांचे लेखी निवेदन खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, कणकवली मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रत्नागिरीचे अभियंता, राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय खारेपाटणचे सहाय्यक अभियंता आणि या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण के.सी.सी. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: The bridge at Casarde Titha must be boxed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.