रिफायनरी रद्द करा, आम्हांला चर्चा नको, जनतेची भूमिका : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:17 PM2018-08-21T15:17:06+5:302018-08-21T15:20:05+5:30
भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले.
देवगड : एकीकडे जनता मायबाप आहे, त्यामुळे जनतेवर कारवाई करू नका, असे पोलिसांना आवाहन करायचे व दुसरीकडे सामान्य जनतेवर गुन्हे दाखल करायचे अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण प्रमोद जठार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. पूर्वी जठार यांना पोपटाची उपमा दिली जात होती. आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपा व शिवसेनेने रिफायनरी प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला प्रकल्पाबाबत आता कुठल्याही प्रकारची चर्चा नको अशी भूमिका तेथील जनतेने घेतली आहे, असे नीतेश राणे यांनी सांगितले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या देवगड येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नीतेश राणे यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, बाळा खडपे, गणपत गावकर, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर उपस्थित होते.
यावेळी नीतेश राणे म्हणाले, रिफायनरी प्रकल्पाबाबत उघड समर्थन करणाऱ्या प्रमोद जठार यांना शनिवारी गिर्ये व रामेश्वर येथील जनतेनेच जागा दाखविली. लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालत नाही हे एकजुटीने, ताकदीने उतरून जनतेने दाखवून दिले. त्या जनतेला आपला मानाचा मुजरा. रिफायनरीसारखा विनाशकारी प्रकल्प कोकणी माणसांवर जे लादू पहात आहेत त्यांना धडा शिकविण्याचे काम एकजुटीने संघर्ष समिती, त्या भागातील सरपंच व जनतेने करून दाखविले आहे.
विजयदुर्ग रामेश्वर येथे जाऊन आपण माहिती घेतली. रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांना आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांचा त्रास तसेच नोटिसा येत होत्या. तसेच आंदोलन झाल्यानंतर १३ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
एकीकडे आंदोलन करणाऱ्या मायबाप जनतेवर कारवाई करू नका, असे प्रमोद जठार, अॅड. अजित गोगटे व त्यांचे सहकारी विनंती करतात तर दुसरीकडे सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली जाते. याला काय म्हणावे? जठारांना पूर्वी पोपटाची उपमा दिली जात होती. आता सरड्याची उपमा देण्याची वेळ आली आहे, अशी टीका नीतेश राणे यांनी केली.
जठार खोटे बोलताहेत
नाणार येथील रिफायनरी प्रकल्प व विजयदुर्ग बंदर हे दोन्ही विषय वेगवेगळे आहेत, असे प्रमोद जठार सांगतात. मात्र, रिफायनरीसाठीच विजयदुर्ग बंदर विकसित केले जाणार आहे. त्यामुळे जठार अजूनही खोटे बोलत आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी यावेळी केली.
...तर सेनेने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत
रिफायनरी प्रकल्प रद्द करावा यासाठी आम्ही आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. विधिमंडळात याच विषयावरून राजदंड पळविला. त्यामुळे जठार यांनी ही माहिती प्रथम करून घ्यावी व नंतरच आम्हांला मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करा असे सल्ले द्यावेत.
यापुढे सेनेच्या उद्योगमंत्र्यांनी व भाजपा नेतेमंडळींनी सत्तेच्या माध्यमातून हा प्रकल्प रद्द करावा. तोपर्यंत आम्हांला कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही अशी जनतेची भूमिका असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. चर्चेचे दरवाजा आता बंद, प्रथम प्रकल्प रद्द करा, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचा प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांनी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, असे आव्हान नीतेश राणे यांनी दिले. प्रमोद जठार यांनी चेंबूरमध्ये झालेली दुर्घटना हा घातपात होता. त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असे सांगितले. मात्र, तो घातपात होता अशाप्रकारची कुठलीही माहिती आपल्याकडे नाही. जठारांनी ही धूळफेक कशाला करावी? तशाप्रकारच्या घटना घडू नयेत एवढीच आमची अपेक्षा आहे, असेही राणे यांनी सांगितले.