चांदा ते बांदा योजना रद्द होऊ देणार नाही- वैभव नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 07:16 PM2020-01-16T19:16:07+5:302020-01-16T19:18:38+5:30
युती सरकारने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली होती.
कुडाळ- चांदा ते बांदा ही योजना अतिशय लोकांसाठी केलेली योजना आहे. योजना रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला तरी तो आदेश रद्द करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार असून तो आदेश लवकरच रद्द होईल अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
मागील युती सरकारने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली होती. या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर व राज्याचे गृह राज्य व वित्त मंत्री दीपक केसरकर यांनी ही योजना सुरू करण्यासाठी व अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून ही योजना रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच प्रशासना मध्ये केली जात होती.
याबाबत आमदार वैभव नाईक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सदरची ही योजना अत्यंत महत्त्वाची व लोकांसाठी असलेली योजना आहे. या योजनेचे महत्त्व जनसामान्यात वाढत आहे. त्यामुळे ही योजना रद्द होता कामा नये. याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर व मी असे सर्वजण मिळून या बाबत मुख्यमंत्री व वित्त मंत्री यांची भेट घेऊन ही योजना रद्द होता कामा नये अशी मागणी करणार आहोत. तसेच ही योजना रद्द करण्याचे जर प्रशासन स्तरावरून आदेश निघाले असले तरी हा आदेश रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून तो आदेश लवकरच रद्द होईल असेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.