चंद्रकांतदादांनी सावंतवाडीत दिली पत्रकारांच्या प्रश्नांना बगल, म्हणाले आज फक्त माझाच अजेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:28 PM2018-02-09T21:28:33+5:302018-02-09T21:41:11+5:30
महाराष्ट्रात नेहमी पत्रकारांशी खुल्या दिलाने संवाद साधणारे राज्याचे बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क आता पत्रकारांच्या प्रश्नांना फुल्ली मारल्याचे दिसून येत आहे.
सावंतवाडी - महाराष्ट्रात नेहमी पत्रकारांशी खुल्या दिलाने संवाद साधणारे राज्याचे बांधकाम तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क आता पत्रकारांच्या प्रश्नांना फुल्ली मारल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सावंतवाडी येथे आलेल्या मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधणे टाळले. मात्र पत्रकारांनी आग्रह करताच माझा अजेंडा असेल तर बोलेन, तुमच्या प्रश्नांना उत्तरे देणार नाही, असे म्हणत बांधकाम अधिका-यांशी झालेल्या बैठकीची माहिती देत काढता पाय घेतला.
महाराष्ट्राचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण राज्यात फिरत आहेत. तसे ते शुक्रवारी सिंधुदुर्गात आले होते. त्यांनी सावंतवाडीतील निर्माण भवन येथे बांधकामच्या सर्व अधिका-यांशी बैठक घेत भविष्यात कशा प्रकारे कामाचे नियोजन करावे लागेल यांचा सक्षिप्त आढावा घेतला.
त्यानंतर ते बैठक आटोपून बांदा येथे निघत असतानाच पत्रकारांशी संवाद साधावा असा आग्रह धरला असता मंत्री पाटील यांनी नकार दिला. तरीही त्यांनी मी तुमच्याशी संवाद साधतो, पण माझा अजेंडा असेल, तुमचा अजेंडा मला चालणार नाही, असे सांगत बोलण्यास सुरूवात केली. एरव्ही मंत्री चंद्रकांत पाटील पत्रकारांच्या गळ््यातील ताईत मानले जायचे, पण अलीकडच्या काळात मंत्री पाटील यांनी पत्रकारांकडे पाठ फिरविली आहे.
मध्यंतरी काँग्रेस नेते नारायण राणे यांना भाजपमध्ये आणण्याचा विषय असो अगर कोल्हापूरातून महाराष्ट्राचे राजकारण चालत असल्याचा राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केलेला आरोप यामुळे मंत्री पाटील यांनी पत्रकारांशी बोलून वाद वाढवून घेणे टाळल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच सावंतवाडीत येऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळत निघून गेले.
राणेंवर प्रश्न विचारू नये म्हणून शक्कल
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत प्रश्न विचारू नये म्हणूनच बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक संपताच काढता पाय घेतला आणि निघून गेले, अशी चर्चा भाजप कार्यकर्त्यात होती. कारण मंत्री पाटील यांच्या मागील सावंतवाडी दौºयावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री पाटील यांनी केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला होता.