उशिराने रुग्ण दाखल होत असल्याने दगावतो : के. मंजुलक्ष्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 03:44 PM2021-06-18T15:44:43+5:302021-06-18T15:46:39+5:30
CoronaVirus In Sindhurug : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या मोठी दिसत असली तरीही रुग्ण पॉझिटिव्हिटी दर खाली आलेला आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात हे आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या मोठी दिसत असली तरीही रुग्ण पॉझिटिव्हिटी दर खाली आलेला आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात हे आहे. त्याचबरोबर ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. ते कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, रुग्णसंख्या अधिक दिसत असली तरी तपासणी वाढवल्यामुळे ही संख्या अधिक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटस्पॉट निश्चित केले असून त्या ठिकाणच्या तपासण्या अधिक प्रमाणात वाढविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची साथ इतर जिल्ह्यांपेक्षा उशिराने सुरू झाली आणि ती मोठ्या प्रमाणात वाढली. आता ही साथ हळूहळू आटोक्यात येत आहे, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.
मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
राज्याचा मृत्यूचा दर हा दोन टक्के आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यू रेट २.४ टक्के एवढा आहे. हा खरे म्हणजे जास्तच आहे. याचे कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात. रुग्ण गंभीर झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल होतो आणि त्याचा परिणाम मृत्यूमध्ये होतो, तसेच ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मात्र, हे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयातील चार तज्ज्ञ फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अजून चांगले उपचार करणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.