नाणारबद्दलच्या मुख्यमंत्री विरोधी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध :राजश्री धुमाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 03:44 PM2019-09-20T15:44:51+5:302019-09-20T15:46:06+5:30
मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने कोकणात आले होते. राजापूर येथे नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देत प्रकल्प करण्याच्या बाजूने सहमती दर्शवली. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा आम्ही भाजप पदाधिकारी जाहीर निषेध करीत असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी सांगितले.
कणकवली : मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने कोकणात आले होते. राजापूर येथे नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देत प्रकल्प करण्याच्या बाजूने सहमती दर्शवली. त्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा आम्ही भाजप पदाधिकारी जाहीर निषेध करीत असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्षा राजश्री धुमाळे यांनी सांगितले.
कणकवली भाजपा कार्यालय येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी भाजप वाहतुक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिशीर परूळेकर, तालुकाध्यक्ष संदेश सावंत- पटेल, विजय चिंदरकर, रमेश पावसकर, संतोष पुजारे, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीतील कार्यकर्त्यांचा विरोध असतानादेखील केवळ मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातर आम्ही विनायक राऊत यांचा प्रचार केला. त्या विनायक राऊत यांना आमच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून नाणार प्रकल्पाचे समर्थन करण्यात आले आहे. त्यांनी हे समर्थन करताना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत आम्ही अभ्यास केला असून रोजगारासाठी नाणार प्रकल्प कोकणात व्हायला हवा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबद्दल वक्तव्य करण्यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरीबाबत आदित्य ठाकरे यांचा सल्ला घ्यावा, अशी बोचरी टिकाही राजश्री धुमाळे यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, भारतीय जनता पार्टीचा नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रह आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने कोकणात येणारा हा महत्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळे जनतेला विश्वासात घेऊन नाणार प्रकल्प व्हावा ही आजही आमची भूमिका आहे.
प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली नाणार प्रकल्पाचे समर्थन आम्ही करत आहोत. निवडणुकीनंतर नाणार प्रकल्पावर चर्चा होऊन प्रकल्प होण्याबाबत आमचे सातत्याने प्रयत्न राहतील. गेल्या पाच वर्षात खासदार विनायक राऊत यांनी रोजगार निर्मितीसाठी काय केले? ते सांगावे. जिल्ह्यात टॉवर आहेत पण रेंज नाही . अशी स्थिती बीएसएनएलची आहे. त्याबाबत त्यांनी काय केले ? असा सवालही राजश्री धुमाळे यांनी यावेळी व्यक्त केला.
जठारांच्या टाळीला नितेश राणेंनी टाळी द्यावी !
दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी केवळ बीएसएनएलच्या टॉवरची भूमिपूजने केली. त्या ठिकाणी अद्यापही मोबाईला रेंज येत नाही. सहा - सहा महिने दिल्लीत जावून बसणाऱ्या खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर विनाकारण टिका करू नये. कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी नाणारबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. सर्वप्रथम प्रमोद जठार यांनी नाणारच्या समर्थनार्थ काम केले आहे. त्यांच्या टाळीला टाळी आमदार नितेश राणे यांनी द्यावी, असेही राजश्री धुमाळे व शिशीर परुळेकर यावेळी म्हणाले.