बालचमूंची स्वारी चक्क सजविलेल्या बैलगाडीतून

By admin | Published: June 16, 2016 09:44 PM2016-06-16T21:44:27+5:302016-06-17T00:50:17+5:30

साटेली केंद्रशाळेतील उपक्रम : अनोख्या स्वागताने जिल्ह्यात चर्चा

Childlike invasion of bullock cart | बालचमूंची स्वारी चक्क सजविलेल्या बैलगाडीतून

बालचमूंची स्वारी चक्क सजविलेल्या बैलगाडीतून

Next

साटेली भेडशी : साटेली केंद्रशाळेत पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांची स्वारी बुधवारी सजवलेल्या बैलगाडीतून थेट वाजतगाजत शाळेत दाखल झाली. शाळा प्रवेशाचा आयुष्यातील पहिला दिवस चिमुकल्यांच्या स्मरणात रहावा, म्हणून प्रभारी मुख्याध्यापिका पूनम पालव यांनी सहकारी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीच्या साहाय्याने तो संस्मरणीय बनवला. केंद्रशाळेच्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी तोंडभरून कौतुकही केले.
शिक्षण विभागाने पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत वेगवेगळ्या पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कुणी ओवाळून, कुणी गुलाबपुष्प देऊन, कुणी गोडधोड देऊन नवागतांचे स्वागत केले. साटेली केंद्रशाळेच्यावतीने शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे ओवाळून, गुलाबपुष्प व गोडधोड देऊन स्वागत केलेच; शिवाय शाळेचा पहिला दिवस आयुष्यभर लक्षात रहावा, म्हणून पहिलीत प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढली. बाजारपेठ व गावात मिरवणूक काढून मग त्यांना शाळेत दाखल करून घेतले. शाळेत जायचे म्हणून किंवा आईबाबांना सोडून वेगळे व्हायचे, म्हणून एरवी रडकुंडीला येणारी मुले आज मात्र खुशीत होती. त्यांच्या शाळा प्रवेशाचा उत्सव आणि त्यातून मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. दुचाकी, रिक्षा अथवा मोठ्या गाडीतून मुलांना शाळेत सोडले जाते. पण पहिल्याच दिवशी त्यांना बैलगाडीत बसून शाळेत नेल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय भासला. साटेली भेडशीचे सरपंच नामदेव धर्णे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मयेकर, कृष्णा तांबे, मंगेश मयेकर, नवाब शहा, सर्व पालक, केंद्रप्रमुख डी. एन. पावरा, मुख्याध्यापिका पूनम पालव, जयसिंग खानोलकर, प्रसाद दळवी, गोपाळ पाटील, दिग्विजय फडके, शुभांगी पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Childlike invasion of bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.