सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे अपघात होतात त्या अपघातात दुचाकीस्वारांचेच जास्त बळी गेले आहेत. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करण्यात येणार असल्याची माहिंती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी २७ व्या रस्ता सुरक्षा अभियानात बोलताना दिली.येथील उपप्रादेशिक परिवहन विभागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाषणात जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोेलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बी.जी.खंडागळे, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरिक्षक संजय साबळे, वाहन मोटर निरिक्षक उदयसिंह पाटील, पी. आर. रजपूत, पी. डी. सावंत, सौरभ पाटील, श्रीधर मांगलेकर, अधिकारी वाहन चालक, मालक संघटना, उपप्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, म्हणाले केंद्रशासनाने यावर्षी ‘रस्ता सुरक्षा-कृती करण्याची वेळ’ हे घोष वाक्य दिले असून या अनुषंगाने यांची अंमलबाजावणी होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी भारतात रस्ते अपघातात सुमारे दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. चार मिनिटाला एकाचा अपघातात मृत्यू होतो. ही आकडेवारी भयावह आहे. याला आळा न घातल्यास आगामी काही वर्षात प्रतिदोन मिनिटाला एकाचा मृत्यू होईल अशी शक्यता आहे. दरवर्षी सुमारे तीन लाख ८० हजार कोटी रूपयांचे नुकसान होते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत हे प्रमाण म्हणजे ३ टक्के असे मोठे आहे. घडणारे बहुतांशी अपघात हे नियम न पाळल्यामुळेच घडतात. यामध्ये पादचारी व मोटरसायकलने वाहतूक करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना मोटर सायकलचा वापर करताना हेल्मेटचा वापर सक्तीचा करण्यात आला असून वाहन चालवताना संयम ठेवणे, मोटरसायकलवरून रात्रीचा प्रवास टाळणे, व्यसन न करणे तसेच हेल्मेट सक्ती राबविणार असे मतही त्यांनी व्यक्त केले.जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, रस्ते अपघातात सुरक्षेच्या दृष्टीने इंजिनिअरींग, एज्युकेशन व इंफोर्समेंट या तीन इंग्रजी ‘इ’ ची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानुसार रस्त्यांची बांधणी, वाहतुकीच्या नियमांंची जागृती व नियमांची अंमलबजावणी या तीन गोष्टी काटेकोरपणे कृतीत आणल्यानंतर निश्चितच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होवू शकेल. यावेळी वाहतुक नियम व वाहतुक चिन्ह मार्गदर्र्शन पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत पी.डी. सावंत, प्रास्ताविक किरण बिडकर, सूत्रसंचालन भास्कर कासार तर आभार बी.जी. खंडागळे यांनी मानले.(प्रतिनिधी)
जिल्ह्यात हेल्मेटसक्ती करणार : जिल्हाधिकारी
By admin | Published: January 11, 2016 11:12 PM