मुख्य दरवाजा बंद : जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार पुन्हा मागच्या दाराने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 03:59 PM2021-06-04T15:59:55+5:302021-06-04T16:01:48+5:30
CoronaVirus Sindhudurg : कोरोनामुळे प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचेच चांगले उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय ! कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कमी पडणाऱ्या प्रशासनाने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद करून मागच्या दाराने कारभार सुरू केला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या कर्मचारी तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच हा दरवाजाही शोधावा लागत आहे.
ओरोस : कोरोनामुळे प्रत्येकालाच विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचेच चांगले उदाहरण म्हणजे सिंधुदुर्गजिल्हाधिकारी कार्यालय ! कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कमी पडणाऱ्या प्रशासनाने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद करून मागच्या दाराने कारभार सुरू केला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या कर्मचारी तसेच नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच हा दरवाजाही शोधावा लागत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय इमारत अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयात प्रवेश करण्यासाठी असणारे सर्व मार्ग शुक्रवारी बंद करण्यात आले आहेत. या कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने असे करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
प्रशासनाने इमारतीचे अनेक दरवाजे बंद केल्याने या इमारतीमधील विविध कार्यालयांमध्ये विविध कामांसाठी येणाऱ्या वयोवृध्द आणि दिव्यांग नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ज्याठिकाणी अपंग व्यक्तींसाठी रेलिंग आहेत, त्याठिकाणचे दरवाजे बंद असल्याने त्यांना पायऱ्या आणि जिना चढण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. शासकीय कामासाठी येथे येणाऱ्या वयोवृध्द आणि अपंगांची होणारी ससेहोलपट कधी थांबणार, असा प्रश्न या वयोवृद्ध नागरिकांकडून विचारला जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये संशयित कोरोना संक्रमित व्यक्ती आतमध्ये येऊ नये, यासाठी प्रशासकीय महत्त्वाचा एक दरवाजा सोडला तर अन्य दरवाजे बंद केले होते. यावेळी मुख्य दरवाजाही बंद करण्यात आला होता. त्यामुळे पत्रकारांसह अन्य कर्मचारी, नागरिक यांनी आवाज उठवल्यानंतर मुख्य दरवाजा खुला करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व मार्ग बंद करून मागच्या दरवाजाने काम सुरू केले आहे. केवळ एकाच दरवाजाने कार्यालयात प्रवेश देण्यात येत आहे.
चुकीच्या ठिकाणी उद्घाटन झाले काय?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन मुख्य प्रशासकीय इमारत अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय बांधून पूर्ण झाल्यावर या इमारतीचे उद्घाटन १ नोव्हेंबर १९९४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मुख्य दरवाजा असलेल्या ठिकाणी करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून मुख्य दरवाजा बंद करून मागील दरवाजाला मुख्य द्वार सांगितले जात आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी चुकीच्या इमारतीचे उद्घाटन केले की काय, असा प्रश्न येथे येणाऱ्या नागरिकांमधून विचारला जात आहे.