कणकवली मुख्याधिकारी, नगररचना प्रमुखांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:05 PM2020-12-16T13:05:34+5:302020-12-16T13:09:32+5:30
Kankavli, MuncipaltyCarporation, Sindhudurgnews कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत. शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कन्हैया पारकर यांनी दिली आहे.
कणकवली : कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगररचना प्रमुख मयूर शिंदे हे दोघे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय देत आहेत. शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे राजरोस उल्लंघन केले जात आहे. त्याबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक कन्हैया पारकर यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कणकवली हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर आहे.या शहराची व्यापारी दृष्ट्या चांगलीच प्रगती झाली असून बांधकाम व्यवसाय सुद्धा बहरला आहे.
मात्र, त्याचाच गैरफायदा मुख्याधिकारी विनोद डवले आणि नगर रचना प्रमुख मयूर शिंदे या दोघांकडून घेतला जात आहे. काही बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून बेकायदा बांधकामांना अभय दिले जात आहे.
चुकीची भोगवटा प्रमाणपत्रे दिल्याने शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत आहे. अनेक बांधकामांना अशी भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तसेच कणकवली शहरामध्ये अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे याला जबाबदार हे अधिकारी आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मी त्या माहितीतील एका बांधकामाची परवानगी, बांधकामाचा नकाशा तसेच भोगवटा प्रमाणपत्र यांची मागणी नगरसेवक या नात्याने केली होती. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला. वास्तविक मी नगरसेवक आहे. या शहराचा विश्वस्त म्हणून मला माहिती देण्यास टाळाटाळ करणारे हे अधिकारी सामान्य माणसाला काय वागणूक देत असतील याची कल्पनाही करवत नाही.
नकाशा, परवाना आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आम्हाला संशय आहे. अनेक नागरिकांनी तशा तक्रारी केल्या आहेत. हे दोन्ही अधिकारी आपल्या वर्तणुकीतून त्या संशयाला पुष्टी देत आहेत. त्यामुळे त्यांची सखोल चौकशी करावी . त्यामुळे शहरातील अनेक गैरप्रकार उघडकीस येतील अशी आम्हाला खात्री आहे. त्यासंबंधातील पुरावे आवश्यकता भासल्यास आम्ही सादर करु.
मयूर शिंदे हे आपली इतरत्र बदली करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र , त्यांची बदली झाल्यास इतरत्रही असेच प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची तातडीने चौकशी करून अहवाल सादर करावा आणि शहरे विद्रुप करणाऱ्या या अधिकाऱ्यांना कडक शासन करावे, अशी मागणीही आम्ही केली आहे. असेही कन्हैय्या पारकर यांनी या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.