सावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:05 PM2019-08-31T13:05:11+5:302019-08-31T13:06:12+5:30

सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.

Construction Officer at Sawantwadi Panchayat Committee Meeting | सावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर

सावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर

googlenewsNext
ठळक मुद्देसावंतवाडी पंचायत समिती सभेत बांधकाम अधिकारी धारेवर जिओमुळेच आंबोली घाटाची दुर्दशा; चौकशीची मागणी

सावंतवाडी : सावंतवाडी बांधकाम विभागाच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे, त्यातून निदान चालता तरी येते, अशा शब्दांत पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी बांधकाम अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. तर आंबोली घाटात जिओ केबलला विरोध असताना ती टाकण्यास परवानगी कोणी दिली? याची चौकशी व्हावी. तसेच घाटात वाहनांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सदस्य रुपेश राऊळ यांनी केली.

सावंतवाडी पंचायत समितीची सभा सभापती पंकज पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. यावेळी उपसभापती संदीप नेमळेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. बी. नाईक, सदस्य रवींद्र मडगावकर, रुपेश राऊळ, मनीषा गोवेकर, सुनंदा राऊळ, महादेव चव्हाण, संदीप गावडे, श्रीकृष्ण सावंत आदींसह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सावंतवाडी पंचायत समितीची सभा विविध विषयांवरून चांगलीच गाजली. श्रीकृष्ण सावंत यांनी तालुक्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेसंदर्भात बांधकाम अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. गणेशभक्तांनी खड्ड्यांतून बाप्पा आणावे अशी तुमची इच्छा आहे का? असा सवाल करीत तुमच्या रस्त्यांपेक्षा ओहोळ तरी बरे असे सांगितले. तसेच येत्या दोन दिवसांत खड्डे भरा. अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.

तालुक्यात झालेल्या पूर परिस्थितीमुळे येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात भातपिकाची संख्या मोठी असून तत्काळ कृषी विभागातर्फे पंचनामे करून जेवढे नुकसान झाले आहे त्याच्या नुकसान भरपाईची मागणी मडगावकर यांनी केली.

यावर कृषी अधिकारी यांनी १४५० हेक्टर भात पिकापैकी ७९८ हेक्टर भात पिकाचे नुकसान झाले असून तत्काळ तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे काम चालू आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल, असे सांगितले.

मुसळधार पावसामुळे असनिये, घारपी, फणसवडे, कोनशी या भागातील काजूबागांना बुरशीसदृश रोगामुळे काजूची पाने पिवळी पडत असून काजू बागा उद्ध्वस्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब कोकण विद्यापीठाच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना बोलविण्यात आले असून त्यांच्या अहवालानंतर काजू कलमांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पूर परिस्थितीमुळे तालुक्यातील रस्ते खचले. ठिकठिकाणी दरडी सुद्धा पडल्या असून किती नुकसान झाले व तालुक्याला पूर परिस्थितीत बांधकाम विभागाकडून किती निधी आला याची माहिती द्या, अशी विनंती पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांकडे केली.

त्यावेळी अशी कोणतीच माहिती बांधकाम विभागाकडे उपलब्ध नसल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तालुक्यात एवढी नैसर्गिक आपत्ती येऊन सुद्धा बांधकाम विभागाकडे यासंदर्भात कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याने सदस्यांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली.

Web Title: Construction Officer at Sawantwadi Panchayat Committee Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.