मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर पारंपरिक मच्छिमारांना गुुजरात, कर्नाटक, गोवा आदी परराज्यांतील पर्ससीननेट ट्रॉलर्स विरुद्ध संघर्ष करताना आघाडी शासनाच्या कालावधीत अपहरणाच्या गुन्ह्यांना तर भाजप-युती शासनाच्या काळात खुनाच्या गुन्ह्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला आपण साथ द्यावी, अशी विनंती पारंपरिक मच्छिमारांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी राज ठाकरे यांनी मच्छिमारांचे प्रश्न सुटायचे असतील तर सरकारकडून अपेक्षा करू नका माझ्या हाती सत्ता द्या, असे सांगितले.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मालवण येथील दौऱ्यात मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी मनसेचे नितीन सरदेसाई, आदित्य शिरोडकर, जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले, परशुराम उपरकर, गणेश वाईरकर, भिवा शिरोडकर, श्रमिक मच्छिमार संघाचे रविकिरण तोरसकर, सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्यविक्रेत्या महिला संघटनेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर उपस्थित होते.यावेळी रविकिरण तोरसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीवर मच्छिमारांना परराज्यातील पर्ससीननेट मासेमारीचा प्रश्न आहे. १२ नॉटिकल सागरी हद्दीबाहेर मच्छिमारी करण्यास परराज्यातील ट्रॉलर्सना मुभा असताना पारंपरिक मच्छिमारांच्या क्षेत्रात घुसखोरी करीत परराज्यातील ट्रॉलर्स मच्छिमारी करीत आहेत. यामुळे हजारो कुटुंबीयांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेत असताना शासन कोणतीही भूमिका घेत नसल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य विक्रेत्या महिला संघटनेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर म्हणाल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मासे खारविण्याचा व मत्स्य विक्री करण्याचा महिला अनेक वर्षे व्यवसाय करीत आहेत. या महिलांना शौचालयाची सुविधा नाही. तर पर्यटन व्यावसायिक डी. के. सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला. शासन कोणतेही सहकार्य करत नाही. पर्यटनस्थळापर्यंत जायला रस्ते नाहीत, असे सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी मच्छिमार व पर्यटकांच्या समस्या जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)
पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला साथ द्या
By admin | Published: June 26, 2015 10:09 PM