कणकवली : शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार कणकवलीकरांनी केला आहे. त्यामुळे गेले पाच दिवस कणकवली शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याला गुरुवारीही चांगला प्रतिसाद लाभला.जनता कर्फ्यूमुळे गुरुवारी बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावरून मध्येच एखादे चारचाकी अथवा दुचाकी वाहन गेल्यामुळे शांतता काहीशी भंग झाली तरी परत पूर्वीप्रमाणेच वातावरण तयार होत होते. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली आहे.मात्र, महामार्गावरून काही वाहनचालक ये-जा करताना दिसत होते. शहरात औषध दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत.नागरिकांनी स्वत:ची काळजी घेतानाच इतरांचा विचार करून शासनाने कोरोनाबाबत सांगितलेले नियम पाळले तर लवकर कोरोनावर मात करता येईल. याबाबत आता नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे. अजून तीन दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे.