corona virus : शिरगांव येथे तीन दिवसांत चार कोरोना पॉझिटिव्ह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 02:57 PM2020-09-04T14:57:23+5:302020-09-04T15:00:32+5:30
देवगड तालुक्यातील शिरगांव गांवठण येथे गेल्या तीन दिवसांत चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील व्यापारी संघाने तातडीची बैठक घेऊन पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव गांवठण येथे गेल्या तीन दिवसांत चार कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील व्यापारी संघाने तातडीची बैठक घेऊन पाच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शिरगांव गांवठण येथे कणकवली तालुक्यातील कासार्डेतून विवाहिता आपल्या माहेरी आली होती. तिची मंगळवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर बुधवारी दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्या घरातील गणपती विसर्जन कार्यक्रमात सहभागी झालेल्यांची आरोग्य विभागाने यादी तयार करून त्यांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, बुधवारी कोरोना बाधित आलेल्या या दोघांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर गुरुवारी त्यांच्या मेव्हण्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शिरगांव येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चार झाली आहे. कोरोना बाधित या तिघांच्या घरापुरता कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी शिरगांवला बुधवारी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
पाच दिवस बाजारपेठ बंद राहणार
शिरगांव व्यापारी संघाने बुधवारी सायंकाळी हनुमान मंदिरात तातडीची बैठक घेऊन खबरदारीची उपाययोजना म्हणून ३ ते ७ सप्टेंबर या पाच दिवसांच्या कालावधीकरिता सर्व व्यापाऱ्यांनी आपापली आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र औषधाची दुकाने सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर अत्यावश्यक असल्यास रुग्णांना औषध दुकान उघडून औषधे दिली जाणार आहेत. व्यापारी संघाच्या या निर्णयामुळे नेहमी गजबजलेल्या पंचक्रोशीच्या बाजारपेठेत गुरुवारी शुकशुकाट जाणवत होता.