corona virus : लसीकरणाची मोहीम लवकरच, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:17 PM2020-12-11T17:17:48+5:302020-12-11T17:19:18+5:30
CoronaVirus, collector, sindhudurg राज्य शासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहीम लवकरच सुरू होणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले.
सिंधुदुर्ग : राज्य शासनाकडून कोरोना लसीकरणाची मोहीम लवकरच सुरू होणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कोरोना लसीकरणासाठी अंमलबजावणी समित्या तातडीने गठीत करा, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा परिषद अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, नगरपरिषद, नगरपंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मंगेश जोशी पुढे म्हणाले, कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने लाभार्थ्यांच्या याद्या तातडीने तयार करण्याचे काम करावे. यासाठी डाटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी.
लस साठविण्यासाठी डीप फ्रिजर यांची पाहणी करून देखभाल व आवश्यक असल्यास दुरुस्ती तातडीने कराव्यात. लस वाहतुकीसाठी वाहनांचे नियोजन करावे. वाहनांची संख्या कमी पडत असल्यास वाहन भाड्याने घेण्याची प्रक्रिया तत्काळ राबवावी.
जोशी पुढे म्हणाले, लसीकरणाबाबत शासनस्तरावरून लसीकरणाची अंमलबजावणी रुपरेषा व मार्गदर्शक सूचना तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्या सूचना प्राप्त होताच त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी.
लस देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करा
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यावेळी म्हणाले, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ज्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासंबंधीच्या जागा तातडीने निश्चित कराव्यात. लस देण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण शिबिरांचे तातडीने आयोजन करण्यात यावे.
लस देण्यासाठी सुरक्षा विषय सामुग्रीची यादी तयार करून मागणी संबंधित यंत्रणांकडे पाठवावी. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्यांना ही लस प्राधान्याने देणात येणार असल्याने आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू करावी.