सावंतवाडी : कोरोना महामारीच्या काळात जे अधिकारी जिल्ह्याबाहेर राहिले त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, प्रसंगी त्यांची चौकशीही केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिला आहे.
हे अधिकारी संकटाच्या काळात जिल्ह्याबाहेर न सांगता कसे राहिल? असा सवालही त्यांनी यावेळी केला. आपल्या ओळखपत्रान्वये ते जिल्ह्यात येऊ शकले असते. त्यांनी आम्हांलाही कोणतीही कल्पना दिली नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले.जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी सावंतवाडी नगरपालिकेला भेट दिली. त्यानंतर येथील कोरोनाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, नगराध्यक्ष संजू परब, माजी आमदार राजन तेली आदी उपस्थित होते.यावेळी तेली यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी काही प्रश्नांवर चर्चा केल्या. जिल्ह्यात कोरोनाबाबत सर्वांनीच चांगले काम केले आहे. मात्र आता जिल्ह्यात थोडीफार शिथिलता आणण्यासाठी राज्य सरकारचे नियम, अटी बघितल्या जाणार आहेत. त्यानंतर शिथिलतेबाबत निर्णय घेतले जातील.
हा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आहे. तो ग्रीन झोनमध्ये यावा असे आम्हांलाही वाटते. पण सरकारचे नियम पाळले पाहिजेत. आपल्या जिल्ह्यात एक रुग्ण मिळाला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह येऊन २८ दिवस पूर्ण झाल्यानंतरच हा जिल्हा आॅरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये जाईल, असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.वृक्षतोड तसेच अन्य बाबींना अद्याप परवानग्या दिल्या गेल्या नाहीत. मात्र, घर दुरूस्ती आदी असेल तर उपवनसंरक्षक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त एकही वाहन जिल्ह्याबाहेरून येणार नाही व जिल्ह्यातून जाणार नाही. बाहेरील ठेकेदारांना येथे काम करण्यास अद्याप परवानगी दिली गेली नाही, असेही त्या म्हणाल्या.२८ दिवसांनंतर सिंधुदुर्ग ग्रीन झोनमध्ये जाईलसिंधुदुर्ग जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आहे. याचे कारण आपल्याकडे एक रुग्ण आढळून आला होता. त्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह येऊन २८ दिवस झाले पाहिजेत तरच तो जिल्हा आॅरेंजमधून ग्रीन झोनमध्ये जाईल. अद्याप त्याला २८ दिवस झाले नाहीत, असा खुलासा यावेळी जिल्हाधिकारी यांनी केला. सावंतवाडीतील उपविभागीय कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी काही संस्था तसेच व्यापारी वर्गाशीही चर्चा केली.