मालवणात ८, ९ रोजी सायकल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:21 PM2020-01-23T12:21:41+5:302020-01-23T12:25:10+5:30
अभियान आम्ही मालवणी आणि मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी गिअर विरहित सायकल स्पर्धा महिला व पुरुषांच्या प्रत्येकी दोन गटांमध्ये आयोजित केली आहे.
मालवण : अभियान आम्ही मालवणी आणि मालवण व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी गिअर विरहित सायकल स्पर्धा महिला व पुरुषांच्या प्रत्येकी दोन गटांमध्ये आयोजित केली आहे.
सायकलींचे शहर अशी मालवणची फार पूर्वीपासून ओळख आहे आणि सायकलीचे मालवणशी एक अनोखे नाते आहे. अलीकडे सायकलींची संख्या फार कमी होत चाललेली असून स्वयंचलित दुचाकींचा वापर वाढल्यामुळे पर्यावरण प्रदूषण, व्यायामाचा अभाव, ट्रॅफिक जॅम, पार्किंग, अपघात अशा बहुविध समस्या निर्माण होत आहेत.
यामुळेच शहरातील नागरिकांमध्ये सायकलच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचा मार्ग देऊळवाडा सागरी महामार्ग-सायबा हॉटेल- बोर्डिंग मैदान - कन्या शाळा - टोपीवाला हायस्कूल - फोवकांडा पिंपळ -नगरपरिषद - भरड नाका - एसटी स्टॅण्ड - पेट्रोल पंप - कवटकर ट्रेडर्स - सागरी महामार्ग देऊळवाडा असा असणार आहे.
यात शनिवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी महिला लहान गट - वय वर्षे १५ व त्या खालील मुली, महिला मोठा गट - वय वर्षे १६ ते वय वर्षे ४० पर्यंत तर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी पुरुष लहान गट - वय वर्षे १५ व त्या खालील मुलगे, पुरुष मोठा गट - वय वर्षे १६ ते वय वर्षे ४० पर्यंत अशा गटात स्पर्धा होणार आहे.
मोठ्या गटात अनुक्रमे ३ हजार, २ हजार, १ हजार व उत्तेजनार्थ ५०० रुपये तर लहान गटात अनुक्रमे २ हजार, १ हजार, ८०० रुपये व उत्तेजनार्थ ३०० रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सर्व यशस्वी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. नांवनोंदणीसाठी रवी तळाशिलकर, अरविंद सराफ, हर्षल बांदेकर, दिलीप बांदेकर यांच्याशी संपर्क साधावा. तरी नागरिकांनी या पर्यावरणस्नेही उपक्रमात भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन केले आहे.