दलित नेत्यांचा स्वाभिमान गहाण
By admin | Published: May 27, 2015 01:08 AM2015-05-27T01:08:12+5:302015-05-27T01:19:38+5:30
मीरा आंबेडकरांची खंत : वणंद येथे चौथे रमाई साहित्य संमेलन उत्साहात
दापोली : दलित नेत्यांनी स्वाभिमान गहाण ठेवल्याने दलित चळवळ दिशाहीन होऊ लागली आहे. पैशासाठी नेते स्वत:ला गहाण ठेवू लागले आहेत. त्यामुळे ही चळवळ भरकटली असल्याची खंत मीरा आंबेडकर यांनी व्यक्त केली.
चौथे रमाई साहित्य संमेलन मंगळवारी दापोली तालुक्यातील वणंद येथे आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कोकणातील हे पहिलेच संमेलन आहे. माता रमाई फाऊंडेशन औरंगाबाद या संघटनेतर्फे हे संमेलन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना मीरा आंबेडकर यांनी सध्याची दलित चळवळ व दलित नेत्यांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, राजकीय स्वार्थासाठी दलित नेते अनेकांच्या दावणीला बांधले जात आहेत. समाजात कमकुवतपणा आला आहे. सद्य:स्थितीत समाज एकसंध ठेवणे आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची सध्या समाजाला नितांत आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला व तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचा आदर्श ठेवून धम्म चळवळ पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रमाई यांच्या साहित्यावरही चर्चा करण्यात आली.
या संमेलनाला माता रमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष भारत शिरसाट, प्रिया खरे, स्वागताध्यक्ष आशालता कांबळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रमाईच्या माहेरी सोहळा
दापोली तालुक्यातील वणंद हे रमार्इंचे, रमा आंबेडकर यांचे माहेरगाव. त्यामुळे या गावात संमेलन घेण्याचे माता रमाई फाऊंडेशनने ठरविले व रमार्इंना अनोखी श्रद्धांजली वाहिली.