पावसामुळे भातशेतीचे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 04:24 PM2020-09-25T16:24:58+5:302020-09-25T16:41:13+5:30
सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देवगड : सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भातशेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार मारुती कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, यावर्षी पावसाळी हंगाम चांगला होता व भातशेतीचे उत्पादनही अपेक्षितपणे चांगले आले होते. भातशेती तयार झाल्यानंतर सतत आठवडाभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले पीक शेतात पडून त्याचे नुकसान झाले आहे.
कोरोना संक्रमणामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. यावर्षी ग्रामीण भागातील भाजीपाला उत्पादनात प्रचंड घट झाल्याने ग्रामीण शेतकरी भातशेतीबरोबर भाजीपाला उत्पादनातही कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे कृषी विभागामार्फत भातशेती नुकसानीची पाहणी व तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई त्वरित मिळण्याकरीता प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीचे निवेदन देताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांच्यासह शरद शिंंदे, नागेश आचरेकर, उदय रूमडे, बाबू वाळके, कृष्णा परब आदी उपस्थित होते.