सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस जोरदार पाऊस कोसळत असून, पावसामुळे जनजीवन चांगलेच विस्कळीत झाले होते. रविवारी आंबेगाव येथील घराचे छप्पर कोसळून दोन मुली जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी ओटवणे येथील दूरध्वनी सेवा केंद्राची भिंत कोसळली आहे. त्यामुळे ओटवणे परिसरातील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. मागील दोन दिवसांच्या तुलनेत थोडा पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले.गेले तीन दिवस सावंतवाडी तालुक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पावसामुळे छोट्या-मोठ्या दुर्घटना घडत आहेत. ओटवणे येथील दूरध्वनी सेवा केंद्राची सोमवारी भिंत कोसळली.
आधीच ओटवणेबरोबरच पंचक्रोशीतील दूरसंचारच्या सेवेचे तीनतेरा वाजले असताना ऐन चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवरच या दूरध्वनी केंद्राची भिंत कोसळल्यामुळे दूरध्वनीसेवा पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. गेली कित्येक वर्षे या सेवा केंद्राची अवस्था असून नसल्यासारखी आहे. त्यातच आता इमारतीची भिंत कोसळल्याने आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर थोडा पावसाचा जोर ओसरला असून, सकाळच्या सत्रात पाऊस थोडा कमी होता.दूरसंचार विभागाचे लाखोंचे नुकसानना नियमित कर्मचारी ना नियमित सेवा अशी अवस्था दूरसंचार केंद्राची आहे. त्यातच इमारतीची वाईट अवस्था आहे. गेल्यावर्षीही या इमारतीचा काही भाग कोसळला होता.यात आर्थिक नुकसानीही झाली होती. पण याकडे म्हणावे तसे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे या इमारतीची आणखीनच वाईट अवस्था झाली. गेल्या वेळेप्रमाणे मशिनरी मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली. या घटनेमुळे दूरसंचार विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ही इमारत गेल्या कित्येक वर्षांपासून निर्जीव अवस्थेत असूनही संबंधित यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अशी घटना घडली आहे. सुदैव म्हणजे याठिकाणी कोणी कर्मचारी उपस्थित नव्हता. कर्मचारी श्याम काजरेकर यांनी जाऊन या केंद्राची त्यानंतर पाहणी केली.