तळेरे : कणकवली तालुक्यातील नांदगाव शाळा नं. १ येथे तेली यांच्या घरासमोरील महामार्गात गेलेली धोकादायक विहीर कोसळल्याने एक मार्ग बंद करून महामार्ग ठेकेदार कंपनीने ही विहीर त्वरित बुजविली. त्यामुळे संभाव्य धोका टळला आहे. या विहिरीतून संपूर्ण बिडयेवाडीला पाणीपुरवठा होत होता. त्यामुळे भविष्यासाठी दुसरा मार्ग शोधावा अशी मागणी होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव शाळा नं. १ येथे तेली यांच्या घरासमोरील महामार्गालगत धोकादायक विहीर होती. अगदी महामार्गालगत असल्याने मोठा धोका होण्याची संभावना होती. पाऊस सुरू झाल्याने गेले काही दिवस ही विहीर थोडी थोडी कोसळत होती. तर काही दिवसांपूर्वी रस्त्याचा अंदाज न आल्याने मध्यरात्री एक टेम्पो विहिरीचा कठडा तोडून आत गेला होता. त्यामुळे संरक्षण कठडा तुटून विहीर अधिक धोकादायक बनली होती.
गेल्या आठ दिवसांत मुसळधार पावसामुळे विहिरीची माती हळूहळू ढासळत होती. दोन दिवसांपूर्वी विहीर कोसळण्यास सुरुवात झाल्याने वाहनांसाठी तेथून वाहतूक करणे धोकादायक बनले. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी महामार्ग कंपनीला याची माहिती दिली.
त्यानंतर केसीसी कंपनीने त्वरित विहीर काळीथर दगडाने बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून कोसळत असलेली धोकादायक विहीर बुजविण्यात आली. यामुळे भविष्यात होणारे धोके टळले आहेत. नांदगाव बिडयेवाडीला या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा होत होता. त्यामुळे तेथील ग्रामस्थांना आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे.