कणकवलीत सापडला मृतदेह, पोलिसांकडून पंचनामा, मृतदेह ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 01:03 PM2020-01-24T13:03:43+5:302020-01-24T13:06:46+5:30
कणकवली येथील पटकीदेवी मंदिरापासून जवळच असलेल्या मच्छीमार्केटनजीक मोकळ्या जागेत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दिसून आला. त्यांनी पोलिसांना त्याबाबत कळविले. त्यानुसार घटनास्थळी दाखल झाले.
कणकवली : येथील पटकीदेवी मंदिरापासून जवळच असलेल्या मच्छीमार्केटनजीक मोकळ्या जागेत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह बुधवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना दिसून आला. त्यांनी पोलिसांना त्याबाबत कळविले. त्यानुसार घटनास्थळी दाखल झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले व पथकाने कुजलेला मृतदेह प्लास्टिकमध्ये भरून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेला. त्या मृतदेहाशेजारी सापडलेल्या बॅगेत एक औषधाची चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीवर राजेंद्र म्हाडगुत (३०) असे नाव आढळून आले आहे. त्यामुळे तो मृतदेह त्या नावाच्या व्यक्तीचाच आहे का? याबाबत पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
दरम्यान, राजेंद्र म्हाडगुत नावाचा एक कामगार काही दिवसांपूर्वी कणकवली येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्यानुसार नातेवाईकांची कुडाळ, मालवण, सावंतवाडी तालुक्यात शोधमोहीम पोलीस राबवित आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली मच्छीमार्केटलगत मोकळ्या जागेत एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले व अमोल चव्हाण यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याशेजारी असलेल्या एका बॅगची झाडाझडती करण्यात आली. त्यामध्ये एका डॉक्टरकडे उपचार घेतल्याची चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीवर राजेंद्र म्हाडगुत असे नाव लिहिलेले आहे.
तसेच संबंधित व्यक्ती कणकवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये काम करीत होता, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. तसेच राजेंद्र म्हाडगुत हा सावरवाड-मालवण येथील असल्याचेही सांगण्यात येत आहे.
त्याचबरोबर सावंतवाडी-सांगेली, कुडाळ या तालुक्यांमध्येही राजेंद्र म्हाडगुत नावाची व्यक्ती होती का? याबाबत पोलीस विभागामार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, बुधवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत पुष्टी मिळू शकली नव्हती. त्यामुळे या मृतदेहाचे गूढ आणखीनच वाढले आहे.
त्या मृतदेहाचा चेहरा पडला होता काळा; बघ्यांची मोठी गर्दी
सापडलेल्या मृतदेहाला कुजलेला वास येत होता. एका पायाचा काही भाग हिंसक प्राण्यांनी खाल्ल्याची चर्चा घटनास्थळावर होती. या मृतदेहाच्या ठिकाणावरुन जवळ रस्ता असूनही तो कुजेपर्यंत कोणाच्याही निदर्शनास आले नव्हते. साधारणत: गेले २-३ दिवस मृतदेह त्याच जागी कुजलेल्या अवस्थेत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या मृतदेहाचा चेहरा संपूर्ण काळपट पडला होता. प्रथमदर्शनी हा मृतदेह जळालेला असावा अशी चर्चाही कणकवली शहरात रंगली होती. मात्र, तीन दिवसांच्या प्रखर उन्हाने चेहरा जळाल्यासारखा दिसत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
या घटनेची माहिती समजताच तो मृतदेह पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळावरुन मृतदेह पोलिसांनी हलविला. शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या शोधासाठी काही तास ठेवून ती मृतदेह दफन करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.