मुंबई : फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले सावंतवाडीचेशिवसेना आमदार दीपक केसरकर यांना नारायण राणे यांनी जोरदार धक्का दिला आहे. सावंतवाडी नगराध्य़क्ष पोटनिवडणुकीत केसरकरांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला आहे. नारायण राणेंना तब्बल 23 वर्षांनी सावंतवाडी नगरपालिका ताब्यात घेण्यात यश आले आहे.
सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी रविवारी मतदान झाले. या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तब्बल सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर, भाजपचे अधिकृत उमेदवार सच्चिदानंद उर्फ संजू परब, महाविकास आघाडीचे खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, काँग्रेसचे ॲड. दिलीप नार्वेकर, बबन साळगावकर, अमोल साटेलकर हे निवडणूक लढवत होते.
आज या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार संजू परब यांचा विजय झाला. शिवसेनेचे उमेदवार बाबू कुडतरकर यांचा 313 मतांनी पराभव झाला. ही निवडणूक दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील असल्याने राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी प्रतिष्ठेची केली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बंडखोर उमेदवार राजन तेली यांना नारायण राणे यांनी पाठिंबा दिला होता. मात्र, केसरकर यांना परभूत करण्यास अपयश आले होते. यामुळे केसरकर यांना काहीसा धक्काच राणे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिला आहे. जिल्ह्यात पोटनिवडणुकीत भाजपचा सलग तिसरा विजय झाला आहे.