सभापती दालनात धक्काबुक्की, कुडाळ पंचायत समितीमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 05:40 PM2020-10-17T17:40:53+5:302020-10-17T17:42:13+5:30
panchayat samiti, kudal, shindhudurgnews कुडाळ पंचायत समिती सभापतींच्या दालनात तालुक्यातील एका गावातील एका ठेकेदाराने तक्रारदाराला बोलावून घेत त्याला धक्काबुक्की करीत धमकी दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराची गंभीर दखल पंचायत समिती प्रशासनाने घेत या घटनेची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
कुडाळ : कुडाळपंचायत समिती सभापतींच्या दालनात तालुक्यातील एका गावातील एका ठेकेदाराने तक्रारदाराला बोलावून घेत त्याला धक्काबुक्की करीत धमकी दिल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराची गंभीर दखल पंचायत समिती प्रशासनाने घेत या घटनेची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत कुडाळ पंचायत समिती येथे होत असलेल्या चर्चेतून माहिती मिळाली की, तालुक्यातील एका गावात राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सुरू आहे. हे काम शिवसेनेत अलीकडे कार्यरत असलेल्या एका ठेकेदाराने घेतले. या कामाबाबत गावातील एकाने तक्रार केली. त्यामुळे कामाचे बिल रखडले.
परिणामी ठेकेदार हवालदिल झाला. बिल मिळत नसल्याने संबंधित विभागाकडे त्याने विचारणा केली. त्यामुळे याबाबत तक्रार असल्याने बिल काढता येणार नाही, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या ठेकेदाराने ही बाब सभापतींच्या कानावर घातली. त्यानंतर संबंधित गावातील ग्रामसेवक आणि संबंधित तक्रारदार यांना पंचायत समितीत बोलविण्यात आले होते.