कणकवली : तालुक्यातील सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या फणसवडे या अतिदुर्गम गावातील जिल्हा परिषद आदर्श शाळा, फणसवडे या शाळेत ‘स्मार्ट डिजिटल शाळा’ हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे उद्घाटन माजी मुख्याध्यापक चंद्रकांत सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना बोडके, दाणोली केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख शिवाजी गावीत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुराव गावडे यांच्यासह उपाध्यक्ष, सदस्य, पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत सावंत म्हणाले, गेल्या चौदा वर्षांत शाळेचा कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक असा सर्वांगीण विकास झाला असून जिल्हा परिषद आदर्श शाळा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि हितचिंतकांच्या प्रयत्नातून शाळा डिजिटल झाली आहे, असे सांगत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
शिवाजी गावीत यांनी डिजिटल शाळा होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक लंबे यांनी केले तर आभार शिक्षक नवखरे यांनी मानले.