सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वाढलेल्या घरफोडीच्या धर्तीवर जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यात राबविलेल्या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये ३७ महत्त्वाच्या ठिकाणचे २४ लॉज तपासण्यात आले. यात ७४२ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८ जणांना समन्स तर एकाला वॉरंट बजावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या नेतृत्वाखालील या पोलिसी कारवाईमुळे अवैध आणि गुन्हेगारी गोटात खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात जेव्हा पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरोधात कठोर पाऊल उचलले जाते त्याचवेळी घरफोड्या, चोऱ्या अशा भुरट्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी याची त्वरित दखल घेत या गुन्हेगारी जगताच्या विरोधात कारवाईचे फास आणखी घट्ट केले.
रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत पोलीस दलाचे हे छापासत्र जिल्हाभर सुरू राहिले आणि जिल्ह्यातील या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जगतावर पोलिसांची कारवाई सुरू झाली.जिल्ह्यातील ३७ संवेदनशील ठिकाणची २४ हॉटेल्स, लॉज, सरप्राईज चेकिंग काही तपासणी नाके या ठिकाणी छापा टाकला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाचवेळी मोठी कारवाई प्रथमच झाली असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अनेक संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पोलिसांनी ७०५ संशयित ताब्यात घेतले असून यात ३६ वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यापूर्वीच्या काही गुन्ह्यांत पोलिसांना हवे असलेले १२ संशयित आरोपी पोलिसांना मिळाले आहेत. तर ८ सराईत आरोपी आणि १६ मोस्ट वाँटेड संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत.या आॅल आऊट आॅपरेशनमध्ये एकूण ७४२ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ८ जणांना समन्स तर एकाला वॉरंट बजावण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली. या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली नाही.चोरी, घरफोडी, संशयित आरोपी किंवा गुन्ह्यांची माहिती तसेच अवैध धंद्यांविषयीची माहिती सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाच्या ०२३६२-२२८२०० या क्रमांकावर संपर्क साधून द्यावी असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी केले आहे.परप्रांतीयांची माहिती गोळा करापोलिसांच्या या धडक मोहिमेत २१ अधिकारी व ८२ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग रुंदीकरणाचे काम विविध बांधकामांच्या साईट्सवर सुरू आहे. या कामात अनेक परप्रांतीय कामगार दाखल झाले आहेत. त्यांचे नाव, पत्ते, संपर्क नंबर, ओळख याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी गोळा करावी, असे आदेशही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिले आहेत.