ओरोस : जिल्हा बँकेमार्फत जिल्ह्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या व्यक्तींना मानाचे पुरस्कार देऊन गेली सहा वर्षे सन्मान केला जात आहे. या सन्मानाने सत्कारमूर्तींच्या कामाची ओळख राज्य व देशभरांतील लोकांना होत आहे. जिल्हा बँकेचे काम देशात सर्वोत्तम आहे. प्रत्येक वर्षी बँकेला तीन-चार पुरस्कार मिळतात, असे जिल्हा बँकेबद्दल गौरवोद्गार काढताना आमदार वैभव नाईक यांनी पुढील वर्षी होणारा हा पुरस्कार वितरण कार्यक्रम विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्याच अध्यक्षतेखाली व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर बँकेने जाहीर केलेल्या २०१९-२० च्या विविध पुरस्कारांचे वितरण आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
यावेळी बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार अजित गोगटे, संचालक विकास गावडे, अतुल काळसेकर, व्हिक्टर डान्टस, प्रमोद धुरी, गुरुनाथ पेडणेकर, नीता राणे, प्रज्ञा परब, अविनाश माणगावकर, विकास सावंत, आत्माराम ओटवणेकर, विद्याधर बांदेकर, नितीन शेट्ये, गुलाबराव चव्हाण, राजन गावडे, शरद सावंत, प्रकाश मोर्ये, दिगंबर पाटील, प्रकाश गवस, जिल्हा दूध संघाचे जिल्हाध्यक्ष एम. के. गावडे, प्रसाद रेगे, पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार सावंतवाडी येथील डॉ. राजेशकुमार गुप्ता यांना आमदार नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शिवरामभाऊ जाधव स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ लि. कुडाळ यांना, केशवराव राणे स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी संस्था पदाधिकारी पुरस्कार सैनिक नागरी सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गचे संस्थापक पीटर फ्रान्सिस डान्टस यांना, डी. बी. ढोलम स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट सहकारी कर्मचारी पुरस्कार डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना, गगनबावडाचे जयदीप पाटील यांना तर भाईसाहेब सावंत स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा कृषिमित्र पुरस्कार देवगड दहिबांव येथील श्रीधर पुरुषोत्तम ओगले यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. शाल, श्रीफळ, वृक्ष रोप व सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते.कॅन्सर उपचारासाठी निधी उभारणी व्हावी : डॉ. गुप्ताजीवनगौरव पुरस्कार मिळालेले सावंतवाडी येथील डॉ. राजेशकुमार गुप्ता सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. आजच्या पुरस्काराने माझ्या कार्याची दखल समाजाने घेतल्याचे वाटत आहे. गेल्या ४० वर्षांच्या सेवेत दिलेल्या योगदानाचे हे फलित आहे. ३०० शस्त्रक्रिया केल्या. कॅन्सरवरील उपचार महागडे आहेत. जिल्ह्यात चांगली सोय नाही. त्यामुळे कॅन्सरग्रस्त गरीब व्यक्तींना मदत करण्यासाठी निधी संकलन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.