बाहेरच्यांनी तोंड खुपसू नये : जाधव
By admin | Published: May 24, 2015 11:32 PM2015-05-24T23:32:23+5:302015-05-25T00:25:28+5:30
सन २००२च्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा पराभव झाला. तेव्हापासून मारहाणीच्या घटना घडतच आहेत.
चिपळूण : गेली ३२ वर्षे मी राजकारणात टिकून आहे. प्रतिवाद कधी केला नाही. दोन दिवसांपूर्वी माझ्या तुरंबव गावात एका कार्यक्रमात माझे मुलगे, पुतण्या व भाऊ हे बेसावध असताना त्यांच्यावर बाळकृष्ण जाधव व समर्थकांकडून हल्ला झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. हा आमच्या भावकीतील वाद असून, एकतर्फी बाजू जनतेसमोर येत आहे. या भांडणात बाहेरच्यांनी तोंड खुपसू नये, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांचे नाव न घेता आमदार भास्कर जाधव यांनी आज (रविवारी) येथे दिला.
आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुरंबव - पालेवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य सत्कार कार्यक्रमात झालेल्या दोन गटातील मारहाणीबाबत ते बोलत होते. व्यासपीठावरील एकही व्यक्ती गंभीर जखमी झालेली नाही. भाऊ सुनील जाधव, मुलगा समीर, विक्रांत तसेच पुतण्या हे बेसावध असताना त्यांना मारहाण झाली. सोडवायला गेलेल्या लोकांनाच मारहाण झाली. त्यामुळे बाळकृष्ण जाधव यांच्याकडूनच नियोजित हा मारहाणीचा कट होता, असा आरोप जाधव यांनी केला. काळोखातून दगडफेक केली गेली. काहींची खोटी नावे टाकली गेली आहेत. या मारहाणीमागे अन्य कंगोरे आहेत, असे जाधव म्हणाले.
सन २००२च्या निवडणुकीत बाळकृष्ण जाधव यांचा पराभव झाला. तेव्हापासून मारहाणीच्या घटना घडतच आहेत. यामागे खरे सूत्रधार कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. हा विषय घरचा आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. जास्त मार हा आमच्या लोकांना लागला आहे. कारण ते बेसावध होते. पोलिसांवर वेगवेगळ्या पद्धतीने संघटना व बाहेरच्या लोकांकडून दबाव आणला जातोय. त्यामुळे दबाव कसा असतो, ते मी पोलिसांना दाखवून देईन. घरचे भांडण बाहेर जाऊ नये, म्हणून गप्प बसलो होतो. बाळकृष्ण जाधव हे साळसुदपणाचा आव आणत आहेत. सत्याची कास कधी सोडली नाही. बौध्द समाजबांधवांसाठी १५ लाखांचे समाजमंदिर आपण उभे केले आहे. बाळकृष्ण जाधव यांनीच जातीवादाचा लढा उभा केला आहे. अजित पालशेतकर हा देवळात जातो म्हणून त्याचा राग आहे. पोलीसही या प्रकरणात पक्षपातीपणा करीत आहेत. पोलिसांनी निपक्षपातीपणा या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी आपण करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. (वार्ताहर)