प्रसन्न राणे - सावंतवाडी -सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयाची दयनीय स्थिती झाली असून दोनच सरकारी डॉक्टरांवर हे रुग्णालय चालत असून कोट्यवधी रूपये खर्च करूण बसविलेली अत्याधुनिक साधने डॉक्टरांअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. कोट्यवधीच्या सुविधा आणि रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टरच नसतील, तर या सुविधांचे करावे तरी काय? येथे रुग्णांना हवी तशी सुविधाही मिळत नाही, अशी सर्वत्र ओरड असून साध्या आजारांना देखील गोवा-बांबोळीला जावे लागत आहे.सिंंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेली असून, रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक साधने शासनस्तरावर पुरविली जात आहेत. मात्र, डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. ड्रामाकेअर, डायलेसिस सेंटर यासारख्या अत्याधुनिक सुविधा पुरविण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांचीच वानवा असल्याने या यंत्रणेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित होतो. यापूर्वी अपघातग्रस्त वा कुठल्याही रुग्णांना रुग्णालयात आणले जात याठिकाणी मशीनरी नसल्याने सुविधा देण्यात येणार नाही, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. यावेळी रुग्णांना गोवा-बांबोळी हा पर्याय निवडावा लागत होता. मात्र, आता रुग्णालयात आरोग्य यंत्रणा उपलब्ध असूनही रुग्णांना गोवा-बांबोळी हाच पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. काही वेळा अपघातात गंभीर झालेल्या रुग्णांना येथील शासकीय रुग्णालयात सुविधा नसल्याने गोवा बांबोळी येथे रुग्णालयात नेत असताना रुग्णाचा प्रवासादरम्यान मृत्यू होतो. अशाप्रकारच्याही काही घटना घडल्या आहेत. याठिकाणी सुुलभ आरोग्यसेवा व डॉक्टर उपलब्ध असेल, तरच त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात महिनाभरापूर्वीच डायलेसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडला. मात्र, डायलेसिस सेवा उद्घटनापूरतीच राहिली. उद्घाटनानंतर डायलेसिस सेवा सुरू आहे का, याठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत का, यासंदर्भात अद्यापही विचार करण्यात आलेला दिसून येत नाही. डायलेसिस सेवेच्या उद्घाटनानंतरही याठिकाणी डॉक्टर असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे जिल्ह्यात डॉक्टर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपुऱ्या डॉक्टरमुळे रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून चार-चार दिवस सलग ड्युटी करावी लागत आहे. त्यामुळे कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्याच आरोग्याच्या तपासणीची वेळ आली आहे. काही वेळा रुग्णालयात अत्याधुनिक साधनसामग्री असल्याचे डॉक्टर विसरून जातात. गंभीर रुग्ण असल्यास त्याच्यावर कोणताही प्राथमिक उपचार न करता त्याला गोवा-बांबोळीचा मार्ग दाखविला जातो. त्यामुळे डॉक्टरांची मानसिकता बदलणेही महत्त्वाचे आहे. रुग्णालयात उपचार होत असल्यास त्याठिकाणी उपचार करून रुग्णांना सेवा देणे आवश्यक आहे. खासगी डॉक्टर चालवतो डायलेसिस सेंटर डायलेसिस सेंटर चालवण्यासाठी शासनाने खासगी डॉक्टरांची नेमणूक केली आहे. त्यामुळे भविष्यात सरकारी डायलेसिस सेंटर जर बंद झाली, तर या रुग्णांना आश्रय या खासगी डॉक्टरांचाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च केल्यानंतर एक तरी शासकीय डॉक्टर असावा, अशी सर्वांचीच मागणी आहे.डॉ. दुर्भाटकर रुग्णालयाचे आश्रयदातेसावंतवाडी कुटीर रुग्णालय हे ग्रामीण भागातील महत्त्वाचे रुग्णालय आहे. मात्र, डॉक्टर नसल्याने या ठिकाणी रुग्णांना सुविधा मिळत नाही. मात्र, प्रसुती तसेच महिलांच्या आरोग्यांचे प्रश्न सोडवण्यात सिंधुदुर्गमधील एकमेव अशा कुटीर रुग्णालयाचा उल्लेख केला जातो. या रुग्णालयाचे खरे आश्रयदाते हे डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हेच आहेत.
कुटीर रुग्णालयात डॉक्टरांची वानवा
By admin | Published: May 25, 2015 11:53 PM