गैरसोय होऊ देऊ नका, कामे तातडीने मार्गी लावा : समीर नलावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 07:44 PM2020-01-10T19:44:01+5:302020-01-10T19:46:42+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या. तसेच आगामी काळात नागरिकांच्या आलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यांची गैरसोय दूर करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ देऊ नका, अशा सूचना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या. तसेच आगामी काळात नागरिकांच्या आलेल्या सूचना लक्षात घेऊन त्यांची गैरसोय दूर करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवली प्रांत कार्यालयासमोर तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवर ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत आहे. शहरातील अनेक पथदीप बंद आहेत. बिजलीनगरकडे जाणाऱ्या नागरिकांचा रस्ता बंद करण्यात आला आहे. गटारांची कामे अर्धवट आहेत. ही कामे येत्या पाच दिवसांत पूर्ण करा, अशा सूचना समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात शहरातील नागरिकांसमवेत दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांची विविध समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला बांधकाम सभापती संजय कामतेकर, नगरसेवक शिशिर परुळेकर, दिलीप बिल्डकॉनचे कपिल कुमार, उद्यकुमार चौधरी, अनुप शर्मा, राजू गवाणकर, किशोर राणे, अजय गांगण, राजन परब, मंदार मराठे, गितेश परब, जुवेकर, दुखंडे, अभय राणे आदी उपस्थित होते.
यावेळी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. कणकवली शहरातील प्रश्नांबाबत गांभिर्याने काम करा. कणकवलीत अॅड. उमेश सावंत यांच्या घराशेजारी असलेल्या नाल्याच्या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याठिकाणी अद्याप बांबू, लोखंड, दगड आडवे पडलेले आहेत. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी तुंबलेल्या अवस्थेत राहिल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे.
या ड्रेनेजमुळे संजीवनी हॉस्पिटलर्यंत पाण्याला फुग मारलेली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे अनेकांच्या घरात पाणी पहिल्याच पावसात जाण्याची भीती आहे. त्यामुळे आतापासूनच हा नाला पूर्ण साफ करा. तसेच शहरातील पथदीप अनेक ठिकाणी बंद आहेत, त्यांची दुरुस्ती करा. गटारांची कामे अर्धवट आहेत ती मार्गी लावा. सर्व्हिस रस्ते खड्डेमय बनले आहेत. त्यांचे पुन्हा डांबरीकरण करा, अशा सूचना समीर नलावडे यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवरायांचा पुतळा हलविण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर उड्डाणपुलाला कोणाचे नाव द्यायचे? हे नगरपंचायत सभेत ठरविले जाईल. त्यामुळे कोणीही नावे सुचवून अधिकार नसताना जनतेची दिशाभूल करू नये. शहरातील नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. धुळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने पाणी मारून धुळीवर नियंत्रण ठेवा, असे दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना समीर नलावडे यांनी सांगितले.