खेड : वर्षानुवर्षे विहिरीत साचलेला गाळ आणि कोरडे झालेले बंधारे यामुळे तालुक्यातील पाणीटंचाईच्या संकटात झपाट्याने वाढ होत आहे. नियोजनाअभावी पाणीपुरवठा योजनांची झालेली वाताहत ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईस कारणीभूत ठरत आहे.खेड तालुक्यात एकूण ४८ पाणीपुरवठा योजना बंद असून, ९७ विहिरी आणि पाणीपुरवठा योजना नादुरूस्त आहेत. त्यामुळे तालुक्यात १७ गावांत भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यांना एक शासकीय आणि ३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी आणखी १० गावांना भीषण पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. अशातच नातूवाडी आणि बोरज धरणात पाणी नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे़ आणखी १० गावे व वाड्यांचे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव दाखल होऊनही त्यांना पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीप्रश्नावर आवश्यक निधी देण्याचे सुतोवाच केल्यानंतरही खेड तालुक्यातील पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरसाठी निधी उपलब्ध होत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.संगलट गावातील ९० लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना राजकारण्यांच्या स्वार्थामुळे सध्या बंद आहे. या योजनेला कोरेगाव येथील नदीतून पाणी घेण्यात आले आहे. ही नळपाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली दाखवण्यात आली असली तरी योजनेला सुरुवातीपासूनच पाणी नसल्याने गंभीर स्थिती उद्भवली आहे.गेली ७ वर्षे ही स्थिती कायम आहे. ग्रामस्थ प्रतिलीटर २ रूपये मोजून पाणी खरेदी करीत आहेत. अनेक ग्रामस्थांच्या मालकीची पाळीव जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. ही स्थिती केवळ संगलट गावामध्ये नाही तर इतर गावांमध्येही आहे. घेरारसाळगड गावामध्ये तर सर्वच वाड्यांना पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे.तालुक्यातील ९७ विहिरींमधील गाळ न उपसल्याने या विहिरी बंद आहेत. या सर्व विहिरींतील गाळ काढल्यास पुरेसा पाणीसाठा होऊ शकतो, असे येथील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. गावातील पाणीटंचाईची ही भीषणता प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली आहे.याशिवाय तालुक्यातील २७.२३ दशलक्ष घनमीटर पाणी क्षमता असलेल्या नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या नातूवाडी धरणात आता केवळ ३.९० दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.या प्रकल्पाअंतर्गत कालव्यांची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असून, त्यादृष्टीने धरणातील पाणी ११ मेपासून सोडण्यात येत आहे. आणखी ४ दिवस या धरणातील पाणी सोडण्यात येणार असून, धरण रिकामे करण्यात येणार आहे. याच धरणातील पाणी सुकिवली येथील चोरद नदीमध्ये सोडण्यात येत आहे. तेथून ते तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पुरवण्यात येत आहे.आता हे धरण रिकामे करण्यात येणार असल्याने पाणीटंचाई ऐरणीवर आली आहे. याशिवाय खेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरज धरणातील पाणीसाठा संपल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे नातूवाडी धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू होता. पाण्याबाबतचा करार संपल्याने खेड शहराला पिंपळवाडी धरणातून २० एप्रिलपासून दररोज ३० लाख लीटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील ४० धनगरवाड्यांमध्ये पाणीटंचाई तीव्र आहे. या गावांखेरीज आणखी १० गावे आणि वाड्या तहानलेल्या आहेत. या गावांची तहान हे प्रशासन कसे भागवणार? हाच प्रश्न या गावांना पडला आहे. प्रशासनाची हतबलता आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई व्यापक प्रमाणात हातपाय पसरू लागली असून, त्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली जात आहे.शिंदेवाडी, मोरवंडे मधलीवाडी, सवेणी धनगरवाडी, दयाळ भडवळकरवाडी, धाडवे बुरटेवाडी, गौळवाडी, धुमाळवाडी, वाडी जैतापूर धनगरवाडी अशी १७ गावे आणि ३० वाड्यांना ४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पाणीयोजना, विहिरी दोन्ही नादुरुस्तखेडमधील ज्या गावा अन् वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवते त्यामध्ये खवटी वरचीवाडी, खालचीवाडी, धनगरवाडी, गावडेवाडी, तुळशी बुद्रुक-कुबजाई, देवाचा डोंगर, चिंचवली ढेबेवाडी, आंबवली भिंगारा, महाळुंगे धनगरवाडी, शिरवली दंडवाडी, निळवणे कातळवाडी, तळे धनगरवाडी, पालांडेवाडी, म्हसोबावाडी, देवसडे सावंतवाडी, मधलीवाडी, कदमवाडी, चैरागवाडी, जाधववाडी, बौध्दवाडी, खोपी रामजीवाडी, जाभळेवाडी, तिसंगी धनगरवाडी, कुळवंडीचा समावेश आहे.फक्त भीषणता...!आणखी १० गावे व वाड्यांचे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव दाखल होऊनही या गावांना आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत नाही. संगलट गावातील ९० लाख रूपयांची पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली दाखवली असली तरी या योजनेला पुरेसे पाणी नाही.नातूवाडी धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात येणार असल्याने पाणीटंचाई ऐरणीवर आली आहे. बोरज धरणातील पाणीसाठा संपल्याने खेड शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे.
पाण्याने पोळले अन् टंचाईने जाळले
By admin | Published: May 28, 2015 12:52 AM