कुडाळ : लिफ्टच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसलेल्या संशयित चोरट्यांनी चालकाच्या ताब्यातील रोख रक्कम व गाडी घेऊन पलायन केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री कुडाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर घडली.याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात चालक रुपेश अडुळकर (रा. कणकवली) यांनी तक्रार दिली की, शनिवारी रात्री ते चारचाकी घेऊन गोव्याहून कणकवलीत येत असताना साडेबाराच्या सुमारास पत्रादेवी येथील महाराष्ट्र सीमेवर आले असता तिघांनी गाडीला हात दाखविला.
कसालला जायचे आहे, असे सांगितल्याने अडुळकर यांनी त्यांना गाडीत घेतले. कुडाळच्याजवळ गाडी आली असता त्यातील एकाने उलटी होत आहे, गाडी थांबवा, असे सांगितले. त्यामुळे अडुळकर यांनी गाडी थांबविली. यावेळी त्यातील दोघांनी अडुळकर यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेत गाडीतून बाहेर काढले व चारचाकी घेऊन सावंतवाडीच्या दिशेने पळून गेले.चोरट्यांची भाषा कर्नाटकी असल्याने ते कर्नाटकचे असल्याचा संशय अडुळकर यांनी व्यक्त केला. त्यामुळे आंबोलीमार्गे कोल्हापूर किंवा बेळगावमार्गे ते पुढे गेले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात या तीन चोरट्यांच्या विरोधात लुटमारी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे