वैभव साळकर - दोडामार्ग -केळीच्या सुकलेल्या पानांपासून तयार केल्या जाणाऱ्या द्रोणांचे अस्तित्व प्लास्टिकच्या अतिक्रमणामुळे धोक्यात आले आहे. ग्रामीण भागातील जनतेला घरबसल्या रोजगार मिळवून देणारा हा कुटिरोद्योग संकटात सापडला आहे. केळीच्या सुकलेल्या पानांपासून द्रोण तयार केले जातात. या द्रोणांचा उपयोग पूजेच्यावेळी किंवा धार्मिक कार्यक्रमात प्रसाद देण्यासाठी केला जातो. त्यामुळे त्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असते. केळीच्या पानांच्या द्रोणांच्या तुलनेत अतिशय अल्प दरात प्लास्टिकचे छोटे द्रोण बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे केळीच्या द्रोणांची मागणी घटली आहे. परिणामत: प्लास्टिकच्या अतिक्रमणाचा फटका ग्रामीण द्रोण व्यवसायाला बसला आहे.प्लास्टिकमुळे परिस्थिती बदललीदोडामार्ग तालुक्यात ग्रामीण भागात घरबसल्या हा उद्योग मोठ्या प्रमाणात महिलावर्ग करतात. तालुक्यातील तळकट, कुंब्रल, कोलझर, झोळंबे, फुकेरी परिसरात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. तेथे केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने केळीची सुकलेली पाने काढून त्यापासून द्रोण बनविले जातात. शंभर द्रोणांचा एक साचा बनविला जातो. असे चाळीस साचे एकत्र करून एक बंडल तयार केले जाते. म्हणजेच साधारणत: ३ ते ४ हजार द्रोण एका बंडलात असतात. किमान २५० ते ३०० रूपयांपर्यंत द्रोण तयार करणाऱ्या उत्पादकास दिले जाते. पाच वर्षापूर्वी एका बंडलास ४०० ते ४५० रूपये दिले जायचे, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. गोव्याप्रमाणे बंदी आवश्यकयेणाऱ्या काळात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळवून देणारा हा कुटिरोद्योग नामशेष होण्याची भीती निर्माण झाली आहे. हा उद्योग वाचविण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. गोवा राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आल्याने तेथील बाजारपेठेत केळीच्या पानांच्या द्रोणांना चांगली मागणी आहे. त्याचे अनुकरण सिंधुदुर्गातही होणे गरजेचे आहे, असे ग्रामीण भागातील लोकांचे म्हणणे आहे.
द्रोणांचा कुटिरोद्योग धोक्यात
By admin | Published: December 24, 2014 9:15 PM