नाटकांमुळे विचारात प्रगल्भता वाढते
By admin | Published: May 25, 2015 11:54 PM2015-05-25T23:54:33+5:302015-05-26T00:56:34+5:30
प्रज्ञा खोत : आचरेकर प्रतिष्ठानचा नाट्योत्सव कणकवलीचा सांस्कृतिक चेहरा
कणकवली : सांस्कृतिक कार्यकर्ते, सांस्कृतिक संस्था आणि सांस्कृतिक उपक्रम यामुळे त्या-त्या शहरातील माणसे विचाराने प्रगल्भ होत जातात. वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या कणकवली नाट्य उत्सवामुळे प्रायोगिक रंगभूमीवरील आजवर बहुसंख्य महत्त्वाची नाटके येथील नाट्यरसिकांना पाहता आली. प्रतिष्ठानचा नाट्य उत्सव हा कणकवलीचा सांस्कृतिक चेहरा आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांनी कणकवली नाट्योत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या २३व्या प्रायोगिक नाट्योत्सवाला शनिवारी रात्रीपासून येथील प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात प्रारंभ झाला. याचे उद्घाटन अॅड. प्रज्ञा खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रसाद घाणेकर, धनराज दळवी, आदी उपस्थित होते. अॅड. खोत म्हणाल्या, प्रतिष्ठानचे सांस्कृतिक काम नि:स्वार्थीपणे सुरू आहे. या संस्थेची मीही एक कार्यकर्तीच आहे. त्यामुळे माझ्याच संस्थेच्या नाट्योत्सवाचे या शहराची प्रथम नागरिक म्हणून माझ्या हस्ते उद्घाटन होत आहे, याचाही आनंद आहे. पण थोडे संकोचल्यासारखे वाटत आहे. प्रतिष्ठानचे काम एवढे मोठे आहे की त्या कामाची महाराष्ट्रात दखल घेतली गेली. त्यामुळे प्रतिष्ठानच्या कामातून माझ्यासारख्या रसिकालाही प्रेरणा मिळत आहे.
नाट्योत्सवासारख्या उपक्रमात सातत्य ठेवणे सोपी गोष्ट नाही. आर्थिक पाठबळही अशा कामाला हवेच. त्याशिवाय हे काम दीर्घकाळ उभे राहू शकत नाही. आजच्या इंटरनेटच्या, चॅनेलच्या काळात नाटकापासून रसिक दूर जात आहेत. अशा काळात नाट्य उत्सवाला रसिकांनी पाठबळ देणे म्हणजेच आपल्यातली रसिकता जोपासणे होय, असेही खोत म्हणाल्या. (प्रतिनिधी)
एक दिवस मठाकडे
नाट्योत्सवाच्या पहिल्या दिवशी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान निर्मित, सतीश आळेकर लिखित आणि रघुनाथ कदम दिग्दर्शित ‘एक दिवस मठाकडे’ हा वामन पंडित, डॉ. करिष्मा साटम, शरद सावंत या कलाकारांनी सादर केलेला नाट्यप्रयोग झाला. नाट्योत्सवात एकूण सहा नाटके सादर होणार आहेत. यात ‘लेझिम खेळणारी पोरं’ आणि ‘ऊस डोंगरा परी’ या लक्षवेधी नाटकांचा समावेश आहे.