शिक्षण समिती सभा, रिक्त पदे तत्काळ न भरल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 08:06 PM2020-10-27T20:06:26+5:302020-10-27T20:08:13+5:30
Zp, Education Sector, sindhudurg सिंधुदुर्ग जिल्ह्यात रिक्त पदांमुळे शाळा कशा चालवायच्या आणि दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला तर रिक्त पदे तत्काळ न भरल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रप्रमुख, पदवीधर आणि उपशिक्षकांची अशी मिळून ५०० हून अधिक पदे रिक्त आहेत याचा अध्यापनावर मोठा परिणाम होत आहे. रिक्त पदांमुळे शाळा कशा चालवायच्या आणि दर्जेदार शिक्षण कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने सर्व रिक्त पदे तत्काळ भरावीत असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला तर रिक्त पदे तत्काळ न भरल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज समिती सभागृहात सोमवारी झाली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, विष्णूदास कुबल, सरोज परब, संपदा देसाई, राजन मुळीक आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते .
शिक्षण समितीमध्ये रिक्त पदांचा आढावा घेतला असता केंद्रप्रमुख ४८ पदे, पदवीधर शिक्षक २७२ पदे तर उपशिक्षकांची २८८ पदे रिक्त असल्याची माहिती सभेत देण्यात आली. ही रिक्त पदे भरण्याबाबत शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याची माहिती सभेत देण्यात आली.
यावर चर्चा होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदवीधर व शिक्षकांची महत्त्वाची पाचशेहून अधिक पदे रिक्त असताना येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? शाळा कशा सुरू ठेवायच्या असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्यादृष्टीने तत्काळ ही पदे भरावीत असा ठराव शिक्षण समिती सभेत घेण्यात आला. तर शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत तत्काळ कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा सदस्य विष्णूदास कुबल यांनी सभेत दिला.
शिक्षणाधिकाऱ्यांचा वेळ घेऊनच सभा आयोजित करा
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या संदर्भात गेल्या दोन-तीन बैठकांना विविध प्रश्न उपस्थित होत असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस सभांना उपस्थित राहत नाहीत याबद्दल सभेत सदस्य दादा कुबल आणि संपदा देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सदस्यांचे प्रश्न टाळण्यासाठी ते सभांना गैरहजर राहत असल्याचा आरोप केला.
यावर प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यानी ते मेडिकल रजेवर असल्याचे सांगितले. तरी यापुढे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची मोकळी वेळ घेऊनच आणि फिटनेस दाखला घेऊनच सभेचे आयोजन करा अशी सूचना सदस्या संपदा देसाई यांनी सभेत मांडली.