जांभळाच्या मागणीला जोर
By admin | Published: May 13, 2015 09:52 PM2015-05-13T21:52:15+5:302015-05-14T00:29:33+5:30
रानमेव्याला सुगीचे दिवस : चांगल्या भावामुळे विक्रेत्यांमध्ये समाधान
बाळकृष्ण सातार्डेकर- रेडी
उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यात रेलचेल असते ती ग्रामीण भागातील रानमेव्याची. सध्या रानमेव्याला सुगीचे दिवस आले आहेत. सध्या पर्यटक आणि सुटीच्या दिवसात गावाकडे वळलेले चाकरमानी जांभूळ या रानमेव्याची चव चाखत आहेत. जांभळाच्या हंगामी पिकाची रेडी, शिरोडा, आरोंदा या पंचक्रोशीतून निर्यात वाढली आहे. सध्या जांभळाला मिळणारा भावही विक्रेत्यांसाठी समाधानकाक असल्याने यावर्षी जांभूळ उत्पादक, मजूर व विक्रेते खूश आहेत.
दरवर्षी जांंभळाला ७० ते ८० रुपये किलो दर मिळत होता; यावर्षी मात्र हा दर २०० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. एप्रिल व मे महिना म्हणजे सुटीचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर शहरी व विशेष करून चाकरमानी जांभूळ, करवंदे, या रानमेव्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. बाजारात जांभळाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे वाढलेल्या नफ्यामुळे उत्पादकांना चांगले दिवस आले आहेत.
आंब्यापाठोपाठ जांभळाला मागणी
जांभळाच्या सर्व गुणांमुळेच बाजारपेठेतील जांभळाची मागणी वाढत आहे. दरवर्षी सुमारे ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जाणाऱ्या जांभळाने यावर्षी मात्र २०० चा आकडा पार केला आहे. विकत घेऊन जांभूळ खाणे परवडणारे नसले तरी जांभळाची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे काळ्याभोर, टपोऱ्या तसेच रसरशीत जांभळांनी बाजारात आंब्यापाठोपाठ दर घेतला आहे.
बहुपयोगी जांभूळ
जांभूळ हे तसे दुर्लक्षित फळ, परंतु जांभळाचा वापर मधुमेहावरच्या औषधांसाठी प्रामुख्याने केला जातो. तसेच या फळापासून उत्कृष्ट दर्जाचे मद्यही तयार केले जाते. जांभळाचा रस काढून त्याच्यापासून जांभूळ सरबत, स्क्वॅश, जेली तसेच औषधी सिरपही तयार केले जाते. त्यामुळे लघुउद्योजकांनाही जांभूळ उत्पादनाने रोजगार निर्मिती करून दिली आहे. जांभळाच्या बिया आयुर्वेदात अधिक उपयुक्त ठरत आल्या आहेत. जांभळाच्या रसाला तसेच बिया व भुकटीला औषधी गुणधर्म आहेत. जांभूळ सेवन केल्याने शरीरातील रक्ताच्या शुद्धिकरणास मदत होते. तसेच जांभूळ हे उत्तम पाचक असल्याने पचनशक्ती वाढविण्यासाठीही त्याचा चांगला उपयोग होतो.
निर्यात वाढली
स्थानिक भागातील विक्रीबरोबच जांभळाची निर्यातही वाढल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जांभूळ आरामबस व अन्य वाहनांद्वारे परजिल्ह्यात, राज्यात व मंबईकडे पाठविली जात आहेत. एकूणच जांभळाची वाढलेली निर्यात आणि स्थानिक बाजारपेठेत मिळणारा चांगला भाव यामुळे उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.