फळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Published: March 19, 2015 08:58 PM2015-03-19T20:58:24+5:302015-03-19T23:53:10+5:30

रसायनांचा वापर जास्त : आरोग्यविषयक काळजी घेण्याची गरज

Endanger the fruits of the fruit | फळांचे अस्तित्व धोक्यात

फळांचे अस्तित्व धोक्यात

Next

प्रसन्न राणे - सावंतवाडी मानवाच्या शरीराला पोषक घटक म्हणून प्रामुख्याने फळांची गणना केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसातील बदलत्या हवामानाने फळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे फळांवरील आवरण स्वच्छ धुऊन मुलांना खाण्यासाठी देणे आवश्यक आहे. गेल्या महिन्याभरात उन्हाळी हंगामात पडलेल्या पावसामुळे तसेच सतत सुरू असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळाचे पीक चांगले राहावे, यासाठी विविध रसायने वापरली जातात. यामुळे आहारातील पोषक घटक म्हणून मोठ्या प्रमाणात फळांची उलाढाल होत असते. ही फळे रसायनयुक्त असल्याने या फळांचा वापर स्वच्छ धुऊनच करणे आवश्यक आहे. अन्यथा पोषक घटक देणारी ही फळे जीवितास धोका निर्माण करू शकतात. प्रामुख्याने लहान मुलांना फळे देताना काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे.
हवामानात होणारे बदल यंदा फळांना पोषक असे नसल्याने द्राक्षांसारख्या फळांच्या हंगामात पावसाने आपला जोर कायम केला होता. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी विविध रसायनांचा शेतकऱ्यांनी वापर केला होता. उन्हाळी हंगामात पावसाने जोर कायम केल्याने फळपिकांचे नुकसान होत आहे. यावर्षी फळांच्या पिकावर कीटकनाशकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसायनांची फवारणी करण्यात आली असल्याचे दिसत आहे. यामुळे फळांवर परिणाम दिसून येत आहे. बाजारातील द्राक्षांचा घड पाहिल्यास द्राक्षांवर फिकट पांढऱ्या रंगाचे आवरण पहायला मिळते. लांबड आणि जाड कातडीची द्राक्षे दिसायला अत्यंत आकर्षक असतात. पण, औषधांच्या अतिफवारणीमुळे या द्राक्षांचाही नैसर्गिक रंग जाऊन त्यावर औषधांचा थर पाहायला मिळतो.
फळे धुऊन त्यानंतरच खावीत
घरात कोणतीही फळे आणली, तरी ती स्वच्छ धुऊन मगच खायला देणे आवश्यक आह; पण आता त्यात सुधारणा करून, फळे धुऊन आणि स्वच्छ पुसून मगच खायला देणे आवश्यक बनले आहे. लहान मुलांच्या शरीरावर या फळांवरील औषधांचा व कीटकनाशकांचा परिणाम होत असतो. यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र, हा त्रास कशामुळे होतो, याचा कोणालाच पत्ता लागत नसतो. यामुळे रसायनयुक्त फळे लहान मुलांना स्वच्छ धुऊनच किंवा नैसर्गिक फळे देणे आवश्यक आहे.
काही रासायनिक खते तेलकट असल्याने त्या तेलकट रासायनिक औषधांचा वापर पाण्यामधून फळांवर केला जातो. मात्र, पाण्यात हे तेलकट रासायनिक मिश्रण मिक्स केल्याने संपूर्ण फळांवर तेलकटपणा तसाच राहत असतो.


फळांमध्ये पोषक घटक केवळ हंगामातच
काही फळे हंगामावर पिकत असतात. मात्र, ती फळे वर्षभर बाजारपेठेत विकली जातात. उदा. सफरचंद हे फळ वर्षभर बाजारपेठेत उपलब्ध असते. अशा प्रकारच्या फळांमध्ये फक्त हंगामातच पोषक घटक असून, अन्य हंगामात या फळांमध्ये पोषक घटक राहतातच, असे नाही.

प्रगत देशांमध्ये फळांमध्ये रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर करणे मर्यादित असते. मात्र, आपल्या भागात शेतीतील जमिनीमध्ये फळांच्या पिकांमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण जास्त असल्याने ही रसायनयुक्त फळे लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत. त्यामुळे पपई, चिकू, गावठी केळी, अशी नैसर्गिक फळे लहान मुलांना देणे गरजेचे आहे.
- डॉ. दत्तात्रेय सावंत, बालरोगतज्ज्ञ

Web Title: Endanger the fruits of the fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.