इतिहासकारांच्या नजरेत ‘भैरवगड’ उपेक्षितच

By admin | Published: January 13, 2016 01:23 AM2016-01-13T01:23:32+5:302016-01-13T01:23:43+5:30

गडाचा विकास खुंटला : लोकप्रतिनिधींसह पुरातत्व विभागाचे आजही होतेय दुर्लक्ष

In the eyes of historians, 'Bhairavgad' is neglected | इतिहासकारांच्या नजरेत ‘भैरवगड’ उपेक्षितच

इतिहासकारांच्या नजरेत ‘भैरवगड’ उपेक्षितच

Next

सुभाष कदम -- चिपळूण  व संगमेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवर डौलाने उभा असलेला भैरवगड पुरातत्व विभाग व इतिहासकारांच्या दूरदृष्टीपलिकडे उपेक्षित राहिला आहे. भैरवगडाकडे आजपर्यंत ना इतिहासकारांनी पाहिले, ना राज्य सरकारने! त्यामुळे एक विलोभनीय पर्यटनस्थळ असूनही येथे सोयीसुविधांची वानवा आहे.
भैरवगड हा इतिहासाच्या पानात नसूनही आज डौलाने उभा राहून इतिहासाची साक्ष देत आहे. सातारा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गडावर वर्षातून एकदा जणू येथे शिवछत्रपतींची आठवण करून देणारी यात्रा भरते आणि भैरवगड गजबजून जातो. या गडावर भैरीभवानीचे पुरातन मंदिर होते. या मंदिरातील भैरीभवानीची पूजा अर्चा करण्यासाठी येथे सात मानकरी आजही जमतात.
या मंदिराचा जीर्णोध्दार सात मानकऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केला. भैरवगड येथील भैरीभवानी मंदिरात हिंदू संस्कृतीत साजरे होणारे सर्व सण आनंदाने पार पाडतात. कोकणातील प्रमुख मानला जाणारा होळीचा सण भैरवगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दिवशी येथे मानकरी एकत्र जमतात. भैरीभवानीची शोडषोपचारे पूजा केली जाते. पूजाअर्चा झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता होळी पेटवून मानकरी या तिथीला पूर्णविराम देतात.
भैरव गडावर पिण्याच्या पाण्यासाठी एका उंच शिखरावर तलाव आहे. संपूर्ण उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते. विशेषकरुन हे पाणी खूप थंड असल्याने थकलेल्या माणसांना पर्यायाने गडसफारी करणाऱ्या पर्यटकांना नवसंजीवनीच देते. भैरवगड पाहायला गेलेला प्रत्येक माणूस या पाणवठ्यावर जातोच. या पाण्याचा मोह आवरण्यापलिकडे आहे. गडावरील हिंदू संस्कृतीमधील सर्व तिथी, सणांची काळजी येथील सातगावच्या मंडळींतर्फे घेण्यात येते. सातगावामध्ये संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी, रातांबी, तर चिपळूण तालुक्यातील गोवळ, पाते, मंजुत्री व सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज, गावडेवाडी यांचा समावेश आहे. या सात गावातील प्रत्येक मानकरी विचारविनिमय करून सर्व सण व तिथी साजरे करतात.
हिंदू संस्कृतीत पाडवा हे नववर्ष मानले जाते. या नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यायाने भैरीभवानीची दोन जिल्ह्यांना एकत्र करणारी मोठी यात्रा पाडव्याच्या आदल्या दिवशी भरते. या यात्रेत सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील यात्रेकरू मोठ्या संख्येने सहभागी होतात. यात्रेसाठी मुंबई व पुणे येथील चाकरमानी येत असतात. यात्रेदरम्यान भैरवगड हा शिवभक्तांनी गजबजलेला असतो. यात्रेनिमित्त येणारा प्रत्येक शिवभक्त मंदिरात प्रवेश करुन थेट पाण्याच्या तळ्याकडे जातो. यात्रेला आलेल्या भाविकांची पाणवठ्यावर जाण्याची मजा औरचं असते. या यात्रेत संगमेश्वर व चिपळूण तालुक्यातील बहुसंख्य यात्रेकरु सामील होत असतात. भैरवगड पाहणे व तसेच यात्रेचा आनंद लुटण्यात तरुण - तरुणींची संख्या मोठी असते. भैरवगडावरील मंदिर हे तिथी व सणानिमित्तचं खुले ठेवण्यात येते. कारण तेथे वस्ती नसल्याने पुजारी त्या ठिकाणी राहत नाहीत.
भैरवगडावर जाण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील रातांबी येथून एक पायवाट आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील गोवळ-पाते येथून अर्ध्या रस्त्यापर्यंत पाखाडी बांधण्यात आली आहे. या दोन्ही पायवाटांचा उपयोग करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त ज्या शिवभक्त अथवा पर्यटकांना गाडीचा प्रवास करून गडावर पोहोचायचे असल्यास त्यांना पाटण तालुक्यातील हेळवाक, कोळणे व पाथरपुंज असा प्रवास करून यावे लागते. हा रस्ता अवघड वळणांचा आणि कच्च्या स्वरुपात आहे. परंतु, या रस्त्याने जंगल सफारीचा आनंद घेता येतो.
भैरवगडाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी भैरवगड सातगाव मंडळाने शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्या पत्रव्यवहाराला शासनाने केराची टोपली दाखवली. या गडाचा इतिहासात समावेश झाला नाही, पण किमान पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत तरी अग्रक्रमात समावेश होईल, अशी अपेक्षा होती, आता तीही हवेत विरली. या गडावर जाण्यासाठी असणारा रस्ता पर्यटन विकासअंतर्गत पक्का रस्ता बांधून दिला असता तर सर्वसामान्य माणसाला या गडाच्या सफारीचा आनंद घेता आला असता. मात्र, हा रस्ता सातारा जिल्ह्यातून येतो. मात्र, ही जमीन वन विभागाची असल्याने असंख्य अडचणी निर्माण होतात. सातारा आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या या गडासाठी दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढाकार घेऊन वन विभागाच्या या जाचक अटीतून या गडाची सुटका करायला हवी. वन विभागाची परवानगी घेऊन हा रस्ता डांबरीकरण करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यायला हवा.


गडप्रेमींची मागणी : ‘क’ वर्ग पर्यटनात समावेश करा
रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी किमान पर्यटन विकास योजनेअंतर्गत किंवा ‘क’ वर्ग पर्यटनात या गडाचा समावेश केला तरी या गडाला वैभव प्राप्त होईल. शिवाय एक चांगले पर्यटनस्थळ म्हणून त्याचा विकास होईल. पालकमंत्री वायकर यांनी यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील गडप्रेमींनी पर्यायाने सातगाव मंडळींनी केली आहे.


पर्यटन स्थळ
चिपळूण व संगमेश्वर तालुक्याच्या सरहद्दीवर असणारा भैरवगडाचा विकास केल्यास हा गड पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकतो. त्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. पर्यटनासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे.


भैरव गडावर पिण्याच्या पाण्यासाठी तलाव.
इतिहासाची साक्ष देणारा भैरवगड़
गडावर वर्षातून एकदा भरते यात्रा.
गडावरील मंदिराचा जीर्णोद्धार.

Web Title: In the eyes of historians, 'Bhairavgad' is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.