सिंधुदुर्गनगरी : तिलारी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने हा प्रकल्प पूर्ण होऊन ४१ वर्षे पूर्ण झाली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. याबाबत आजच्या सभेत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी सुचनाही सभेत केली.जिल्हा परिषद जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, समिती सभापती जेरोन फर्नांडिस, डॉ. अनीषा दळवी, अंकुश जाधव, पल्लवी राऊळ, सदस्य सावी लोके, श्वेता कोरगावकर, संजय आंग्रे, उत्तम पांढरे, सरोज परब, निमंत्रित सदस्य प्रमोद कामत, विकास कुडाळकर, अधिकारी आदी उपस्थित होते.बांदा तुळसाण पूल येथे बंधारा बांधल्यास या ठिकाणी पाण्याचा साठा होऊन येथील परिसरातील गावांना पाण्याचा पुरवठा होणे शक्य होऊ शकते. यासाठी आम्ही गेली ३ वर्षे बंधारा व्हावा यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र बंधाऱ्यांबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने सदस्या श्वेता कोरगावकर आणि प्रमोद कामत यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर यावर संबधित क्षेत्र हे तिलारी प्रकल्प क्षेत्रात येत असल्याने त्या ठिकाणी बंधारा घेऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी उत्तर देताना स्पष्ट केले. यावर आपणही तिलारीचे पाणी जिल्हावासीयांना मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र अधिकारी वर्गाकडून सहकार्य मिळत नाही.
येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र पाणी गोवा राज्याला मिळते. परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊन आज ४१ वर्षे पूर्ण झाली तरी जिल्ह्यातील जनतेला पाणी मिळत नाही, असा आरोप उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी सभेत केला. तसेच तिलारी प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली.देवगड तालुक्यातील मिठबाव ही २ कोटी खर्चाची योजना दोन वर्षे बंद आहे. तेथील ग्रामस्थ पाण्यापासून वंचित आहेत. अनेक वेळा हा विषय चर्चेत आणला. बैठका झाल्या तरी ही योजना मार्गी लागली नाही त्यामुळे या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे सदस्या सावी लोके यांनी सांगितले. याची दखल घेत आठ दिवसांत नळयोजनेचे आवश्यक ती कामे करून पाणी पुरवठा सुरळीत करा असे आदेश नाईक यांनी सभेत दिले.पंधरा दिवसांत सर्व्हे करा : समिधा नाईकमालवण तालुक्यातील मिर्याबांद, सर्जेकोट, महान या गावांना पाण्याचा पुरवठा होण्याच्यादृष्टीने तेथील शिवकालीन बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तीन गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत या शिवकालीन बंधाऱ्यांचा सर्व्हे करून अहवाल द्या, असे आदेश ही जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी सभेत दिले.