भराडीदेवीच्या दर्शनासाठी गर्दी, नेत्यांसह सिनेकलाकारांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 03:52 AM2018-01-28T03:52:04+5:302018-01-28T03:52:26+5:30
आई भराडी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त आंगणेवाडीनगरी लाखो भाविकांनी फुलून गेली होती. शनिवारी पहाटे २.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. राजकीय नेते तसेच सिनेकलाकारांबरोबरच लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
आंगणेवाडी (जि. सिंधुदुर्ग) : आई भराडी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त आंगणेवाडीनगरी लाखो भाविकांनी फुलून गेली होती. शनिवारी पहाटे २.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. राजकीय नेते तसेच सिनेकलाकारांबरोबरच लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. ग्रामस्थ मंडळ, जिल्हा प्रशासन व पोलिसांनी यात्रेचे चोख नियोजन केले होते. शनिवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. देवीच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र दहा रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलिसांसह सीसीटीव्ही कॅमेरेही यात्रोत्सवावर लक्ष ठेवून होते. रात्री भाविकांच्या गर्दीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. रविवारी मोडयात्रेने यात्रेची सांगता होणार आहे.
नारायण राणे, तावडेंनी घेतले दर्शन
पहिल्या दिवशी १० लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू, मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे,आमदार किरण पावसकर,शिवसेनेचे सिंधुुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, माजी आमदार विजय सावंत,माजी आमदार शिवराम दळवी, संदेश पारकर, यांच्यासह अभिनेते अरुण कदम यांनीही दर्शन घेतले.
उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका
यात्रेनिमित्त ठाकरे यांच्या हस्ते ‘सिंधुसरस’ या कृषीप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राज्यकर्त्यांना आपले देशबांधव काय करतात हे माहीत नाही. मात्र दुसºया देशात काय चालले आहे हे डोकावून पाहण्याची सवय झाली आहे. देशाचा पंतप्रधान हा देशातील जनतेचे प्रश्न, समस्या जाणणारा पाहिजे. भारताला आज देशवासीयांना जगाच्या पाठीवर नेणारा पंतप्रधान लाभणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.