चिपळुणात रिक्षावाल्यांची अस्तित्त्वाची लढाई सुरु
By admin | Published: May 28, 2015 12:53 AM2015-05-28T00:53:18+5:302015-05-28T00:55:47+5:30
पोटावरचे जगणे : काळाच्या ओघात रिक्षाचालक भरडला जातोय...
संजय सुर्वे -Èशिरगाव
एस. टी. थांब्यापासून रेल्वे स्थानकापर्यंत चिपळूण शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील गल्लीबोळात प्रवाशांना पोहोचवणारा, नियमित अनेक बालकांना शाळेत ने-आण करणारा रिक्षावाला काळाच्या ओघात भरडला जात असून, त्याच्या अस्तित्त्वाची लढाई सुरू झाली आहे.
शासनाने ठरवून दिल्यानुसार मीटरप्रमाणेच भाडे घ्यावे, अशी रास्त अपेक्षा बाळगणाऱ्या प्रवाशांना त्यांची व्यथा समजून येत नाही. शासन मीटर भाडे घेण्यासाठी नियम बनवते. त्यानुसार गल्ली बोळातली मुख्य रस्त्याची स्थिती असते का? हा प्रश्न विचारला जात नाही. रस्त्यापासून कमी उंच असणाऱ्या रिक्षाला नेहमीच मोठ्या खड्ड्यात कसरत करावी लागते. उघड्या रिक्षात सर्व ऋतुत आहे, त्या ठिकाणी स्वत:चा बचाव करत बसावे लागते. महत्त्वाची बाब म्हणजे आपले असणारे ग्राहक काही क्षणात वडापमध्ये बसून जाताना पाहताच त्यांना नेहमी वाईट वाटते. आपल्या रिक्षाचे मीटर, ड्रेस, पासिंग पाहणारे यावेळी गप्प का? असा सवाल विचारला जात आहे.
मुख्य रस्त्यावरच्या थांब्यावरुन येणारे ग्रामस्थ चाकरमानी हा ग्राहक ठरलेला होता. मात्र, आता प्रत्येक घरात किमान एक वाहन आले आहे. तसेच अडल्या वेळेला मोबाईलची साथ मिळाल्याने घरातून स्थानकापर्यंत व्यक्तीला ने-आण करणे सुलभ झाले. हे रिक्षावाल्यांचे धंद्यासाठी मारक बनले आहे. ग्रामीण भागात होणारे अपघात आणि आजारपण यामध्ये क्वचित रिक्षाचा वापर होताना दिसतो. त्यामुळे रिक्षा व्यवसायावर अवलंबून असणारे नेहमीच तणावाखाली असतात.
आपला व्यवसाय सावरण्यासाठी चिपळूण बहादूरशेख, सती, खेर्डी पिंपळी मार्गावर एकत्रित येऊन रिक्षाचालकांनी वडापवाल्यांसोबत समझोता केला आहे. लांब पल्ल्याच्या थांब्यासाठी प्रवासी घेण्याचा कडक नियम पाळला जातो का? यासाठी रोज लक्ष द्यावे लागत आहे. वडापवाले नोकरी, उद्योग नसल्याने खासगी प्रवासी वाहतूक करतात. त्यांना अर्थपूर्ण सहानुभूती मिळते. पण याच उद्देशाने कोणी रिक्षा व्यवसायात आला तर गणित बदलते. संघटनात्मक दृष्टीने पाहता दिवसात अनेक अबालवृध्दांची सेवा करणाऱ्या रिक्षावाल्यांची समस्या शासनाकडे आक्रमक होऊन मांडणारी यंत्रणा (संघटना) दिसून येत नाही.
शहरात मुख्य ठिकाणी नंबरप्रमाणे वाट पाहायची. येणारे ग्राहक किती जवळ-लांब याची माहिती नाही, पण तरीही आशावादी रिक्षावाला हळूहळू शेअर रिक्षा नावाने रुप बदलू लागला आहे.