सावंतवाडी/आरोंदा : आरोंदा येथे होऊ घातलेल्या जेटीवर जेटीधारकाने नियम धाब्यावर बसवून मातीचा भराव टाकला असल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. मंगळवारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी स्वत: जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच मातीचा भराव टाकलेल्या ठिकाणाचे मोजमापही घेतले आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांना सादर करणार असल्याची माहिती प्रांताधिकारी इनामदार यांनी दिली. तर दुसरीकडे आरोंदा जेटीची चौकशी करा, या मागणीचे निवेदन आमदार वैभव नाईक यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना दिले आहे.आरोंदा जेटीबाबत स्थानिक ग्रामस्थ तसेच काँग्रेसने सोमवारी आंदोलनात्मक भूमिका घेतल्यानंतर आता प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. गेले कित्येक दिवस जेटी परिसरात सर्व नियम धाब्यावर बसवून मातीचा भराव टाकण्यात येत होता. याची दखल अखेर मंगळवारी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी घेत स्वत: जेटीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी आरोंदा खाडीच्या समोरच्या भागात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आल्याचे सिध्द झाले. त्यानंतर या भरावाचे मोजमापही घेण्यात आले.शासनाच्या नियमाप्रमाणे मातीचा भराव तसेच अन्य बाबींना उद्योग विभागाने सूट दिली असल्याचे जेटीधारकाचे म्हणणे आहे. मात्र, प्रांताधिकारी इनामदार मंगळवारी आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार असून त्यानंतर दंडाबाबत रक्कम ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी नागपूर येथे अधिवेशनस्थळी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेतली व आरोंदा जेटीबाबत माहिती दिली. तसेच लोकांचा विरोधही त्यांना पटवून दिला. त्यानंतर पर्यावरणमंत्री कदम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे ठरविले आहे. तशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
जेटी परिसरात मातीचा भराव
By admin | Published: December 16, 2014 9:56 PM