कुडाळ : कडावल येथे असलेल्या जैविक कोळसा प्रकल्पाच्या कारखान्याला सोमवारी मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीचा माल जळून गेला आहे. याबाबत सिंधु विकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिवडाव या संस्थेचे अध्यक्ष अजित तांबे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुविकास शेड्युल कास्ट इंडस्ट्रीयल को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शिवडाव (ता. कणकवली) या संस्थेचा जैविक कोळसा प्रकल्पाचा कारखाना कडावल येथे निरुखे, पांग्रड फाट्यानजीक कार्यरत आहे.
सोमवारी मध्यरात्री कारखान्याच्या आवारात क्रशर आणि ट्रान्सफार्मर यांच्यामध्ये असलेल्या जागेतील कच्च्या मालाला अज्ञात व्यक्तीने आग लावली असून कारखान्याचा ३० टन कच्चा माल (उसाची मळी, पोल्ट्री वेस्ट व ब्रिकेट) अंदाजे रक्कम १ लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात संस्थेची तक्रार नोंदविण्यात आल्याचे अध्यक्ष अजित तांबे यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.