तळेरे : येथील लक्ष्मी क्लॉथ सेंटर या कापड दुकानाला सोमवारी सकाळी लागलेल्या आगीमुळे या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत एकूण १० लाख ६५ हजारांचे नुकसान झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, तळेरे बाजारपेठेतील बांदिवडेकर यांच्या कॉम्प्लेक्समध्ये बँक आॅफ इंडियाच्या गाळ्यात रोहिदास बांदिवडेकर यांचे कापड दुकान आहे. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास रोहिदास बांदिवडेकर हे बँकेत जाण्यासाठी आले असता त्यांना आगीचा धूर दिसला. त्यांनी ताबडतोब कापड दुकानाचे शटर उघडले. मात्र, आगीमुळे सर्वत्र धुराचे लोळ दिसत होते. ही आग आपल्या आटोक्यात येणारी नाही, हे लक्षात येताच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना पाचारण केले.
मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. दुकानात सर्व कापड, साहित्य व फर्निचर असल्यामुळे आगीने ताबडतोब पेट घेतला. आगीची भीषणता एवढी होती की, ती आटोक्यात येणे शक्यच नव्हते. तरीदेखील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अवघ्या तासाभरात सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.येथील उल्हास कल्याणकर, शरद वायंगणकर, बाबा वायंगणकर, आप्पा मेस्त्री, अमोल सोरप, राजू पिसे, दिलीप तळेकर, रवींद्र जठार, शुभम खटावकर, विठोबा खटावकर, तेजस तळेकर, गणेश बांदिवडेकर, राजकुमार तळेकर, शिवम खटावकर यांच्यासह बाजारपेठ मित्रमंडळ, दिलीप तळेकर मित्रमंडळ, रिक्षा संघटना, टेम्पो संघटना व व्यापारी संघटना यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
यावेळी कासार्डेचे पोलीस हवालदर शिवाजी सावंत, वायरमन म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली.या कापड दुकानाला लागूनच स्टेशनरी साहित्याचे दुकान आहे व त्याच्या बाजूला बँक आॅफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. सुदैवाने दुकान पूर्णपणे आरसीसी असल्यामुळे बाजूच्या दुकानांना याची झळ पोहोचलेली नाही. अन्यथा, अजून मोठे नुकसान झाले असते. या घटनेचा पंचनामा तलाठी दीपक पावसकर व कासार्डे दूरक्षेत्राचे गणेश भोवड यांनी केला.१0 लाखांचे नुकसान गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वीच रोहिदास बांदिवडेकर यांनी हे दुकान चालवायला घेतले होते. यामध्ये एकूण नऊ लाखांचे कापड साहित्य, ६५ हजारांची रोख रक्कम व एक लाखाचे फर्निचर असे एकूण १० लाख ६५ हजारांचे नुकसान झाले.