देवगड : प्रधानमंत्री आवास योजनेतील देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा हा सदनिका प्रकल्प म्हणजे कमी उत्पन्न गटातील नागरिकांना घरे देण्याचा नगरपंचायत हद्दीतील तसेच महाराष्ट्रातील पहिला उपक्रम आहे. हा प्रकल्प पुढील अडीच वर्षांत पूर्ण करण्यात येणार असून सदनिकाधारकांना चाव्या हातात मिळतील त्यावेळी मुख्यमंत्री भाजपाचा असेल, असा विश्वास आमदार नीतेश राणे यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या हद्दीत कमी उत्पन्न गटातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २४० सदनिका बांधण्यात येणार आहेत. या कामाची सुरुवात आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी प्रभारी नगराध्यक्ष उमेश कणेरकर, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, तालुकाध्यक्ष रवी पाळेकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, भाजपाचे देवगड शहराध्यक्ष योगेश पाटकर, सर्व नगरसेवक, माजी आमदार अजित गोगटे, संदीप साटम, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गव्हाणे आदी उपस्थित होते.
या प्रकल्पाची माहिती आशिष देशमुख यांनी दिली. यावेळी आमदार नीतेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन प्रभारी नगराध्यक्ष उमेश कणेरकर यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निल बांदिवडेकर यांनी केले.सदनिका अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणारप्रत्येक बेघर व्यक्तीला घर मिळावे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यामुळे शासनातर्फे अडीच लाख रुपये अनुदान प्रत्येक सदनिकाधारकांना मिळणार आहेत. सुमारे पाचशे स्क्वेअरफूटची ही सदनिका अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे. ही घरे मिळावीत हे स्वप्न आमचेही होते. नगरपंचायत हद्दीतील हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करा. सदनिकाधारकांच्या हातात वेळेत चाव्या देण्यात याव्यात, असे मत आमदार राणे यांनी व्यक्त केले.