सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरीक्षेत्रात मासेमारी बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 06:05 PM2021-05-20T18:05:10+5:302021-05-20T18:06:00+5:30
Fisherman Sindhudurg : महाराष्ट्र सादरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत यंदाच्या वर्षी दि. 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये पावसाळी मासेमारी लागू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग -मालवण यांनी कळविली आहे.
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र सादरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत यंदाच्या वर्षी दि. 1 जून 2021 ते 31 जुलै 2021 या कालावधीत जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रामध्ये पावसाळी मासेमारी लागू करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग -मालवण यांनी कळविली आहे.
या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असले. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जनत होते. तसेच या काळात खराब वातावरण, वादळी हवामानामुळे मच्छिमारांचे होणारी जीवित व वित्त हानी टाळता येणे शक्य होते. या सर्व हेतून 1 जून ते 31 जुलै 2021 ( दोन्ही दिवस धरून ) सागरी क्षेत्रात ( सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.
सदर पावसाळी मासेमारी बंदी पुढील प्रमाणे असणार आहे. यांत्रिकी मासेमारी नौकांना लागू राहील, पारंपारिक पद्धतीने मसेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू राहतील.
राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिकी मासेमारी नौकांस याकालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियम 1981, कलम 14 अन्वये असे गलबत जप्त करण्यात येऊन त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल, तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लागण्यात येईल, बंदी कालावधीत ज्या मच्छीमार सहकारी संस्थांच्या यांत्रिक मासेमारी नौका मासेमारी करताना आढळतील, अशा संस्थांनी पुरस्कृत केलेले अर्ज रा.स.वि.नि. योजनेच्या लाभाकरिता विचारात घेतले जाणार नाहीत.
बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकेस अवागमन निषिद्ध असल्याचे अतुल पाटणे, आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी कळविले आहे.