सिंधुदुर्गात पूरस्थिती कायम, समुद्रही खवळलेला, वादळ सदृश परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 05:07 PM2019-08-05T17:07:58+5:302019-08-05T17:08:34+5:30
गेले तीन दिवस सिंंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून, जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग : गेले तीन दिवस सिंंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले असून, जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शुक नदीचे पाणी खारेपाटण बाजारपेठेत घुसल्याने ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. तर तेरेखोल नदीचे पाणी बांदा-आळवाडीतील बाजारपेठेत शिरले आहे. पाण्याचा वेग सातत्याने वाढत असून, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बाजारपेठेतील कित्येक दुकाने, मच्छिमार्केट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.
दरम्यान, गेले दोन दिवस समुद्रालाही उधाण आले असून, किनारपट्टीलगत असलेल्या वेंगुर्ले, मालवण आणि देवगड या तिन्ही तालुक्यांतील शहरात समुद्राचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवबाग, तोंडवळी, तळाशिल या किनारपट्टीवरील जमिनीचा काही भूभाग दोन दिवसांपूर्वीच समुद्राने गिळंकृत केला आहे.
मुसळधार पाऊस सुरू असल्याने कुडाळ शहरानजीकच्या आंबेडकरनगरात, काळसे-बागवाडी, मसुरे-कावा आदी भागात पुराणे पाणी वस्तीनजीक आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बांदा-दाणोली रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शेर्ले येथील जुने कापई पूल पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे.
कणकवलीतील केटी बंधारा पाण्याखाली
कणकवली शहरातील गड नदीवरील बिजलीनगर परिसरात असलेला केटी बंधारा सकाळपासूनच पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे यावरून होणारी छोट्या गाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे.